सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : देवगड समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचा छापा: अवैध पर्ससीन मासेमारी करणारी नौका जप्त; २६ परप्रांतीय खलाशी ताब्यात

२६ परप्रांतीय खलाशी ताब्यात; सागरी मासेमारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड समुद्रकिनाऱ्यालगत अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी धडक कारवाई केली. सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवगड येथील ‘स्वामीराज’ (IND-MH-५-MM-५२४८) ही नौका जप्त करून देवगड बंदरात आणली. दरम्यान, तपासणी पथकाला पाहताच इतर काही पर्ससीन नौकांनी समुद्रात पळ काढला.

ही कारवाई मत्स्यव्यवसाय विभागाचे सिंधुदुर्ग सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी पोलीस प्रशासन व सुरक्षा रक्षकांच्या मदतीने केली. देवगड किनाऱ्यालगत केवळ ३ ते ४ वाव खोल पाण्यात महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ मधील तरतुदींचे थेट उल्लंघन करून बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही तात्काळ कारवाई करण्यात आली.

‘स्वामीराज’ या नौकेची कसून तपासणी केली असता तिच्यावर २६ परप्रांतीय खलाशी कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. कायद्यानुसार १२ सागरी मैलांपलीकडे मासेमारी करण्यासाठी प्रवेश परवाना असतानाही ही नौका किनारी भागात येऊन अवैध मासेमारी करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. नौका ताब्यात घेऊन बंदरात आणण्यात आली असून संबंधितांवर सागरी मासेमारी अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी या कारवाईचे स्वागत केले असून, किनाऱ्यालगत अशीच नियमित पाळत ठेवून कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने किनारी भागात नियमित गस्त वाढवून अवैध मासेमारी रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याने पारंपरिक मच्छीमारांचे हितसंबंध जपले जातील आणि सागरी मत्स्यसंपत्तीचेही संवर्धन होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT