देवगड : देवगड तालुक्यातील प्रस्तावित अणुउर्जा प्रकल्पाविरोधात आंबा- काजू बागायतदार व व्यापारी महासंघाने शुक्रवारी मिठमुंबरी-बागवाडी समुद्रकिनारी जाहीर मेळावा घेत जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पालकमंत्री व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल न घेतल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी निषेध केला. मेळावा व जलसमाधी आंदोलनासाठी मिठमुंबरी खाडीकिनाऱ्यावर ५०० हून अधिक आंदोलक उपस्थित होते.
आंबा काजू बागायतदार व व्यापारी संघ, देवगड आणि अणूउर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती यांच्यावतीने मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी शुक्रवारी मेळावा व जलसमाधी आंदोलन आयोजित केले होते. देवगडमध्ये प्रस्तावित अणूउर्जा प्रकल्प रद्द करा व नैसर्गिक आपत्ती व आस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रूपये तर काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रूपये भरपाईपोटी मदत द्या, अशा प्रमुख मागण्यासांठी हे आंदोलन करण्यात आले. जलसमाधी आंदोलनापूर्वी खाडी किनाऱ्यावर मेळावा घेण्यात आला. या व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, ठाकरे शिवसेना सचिव, माजी . विनायक राऊत, रासप नेते व माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आ. वैभव नाईक, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौ.साक्षी वंजारे, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,शिवसेना शिंदे गटाचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, फळबागायतदार संघटना अध्यक्ष आप्पा अनभवणे, अणुउर्जा अभ्यासक मंगेश सावंत, संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश गावकर, किरण टेंबुलकर, दिनेश धुवाळी आदी उपस्थित होते.
मेळाव्यास संबोधताना राजु शेट्टी म्हणाले, आंबा -काजू बागायतदार संघटना गेले चार महिने विविध मार्गाने आंदोलने करून आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रूपये तर काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रूपये भरपाई द्यावी, अशी मागणी करीत आहे. मात्र शासनाने बागायतदारांना हेक्टरी २२ हजार ५०० रू. अशी तुटपुंजी मदत जाहीर करून बागायतदारांची थट्टा केली. शासनाला ठेकेदारांना पोसण्यासाठी तिजोरी खाली करता येते,मात्र बागायतदारांना मजुरीपेक्षाही कमी भरपाई जाहीर करून त्यांची चेष्टा करतना लाज वाटत नाही. अणुउर्जासारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणून येथील नैसर्गिक साधनसंपत्ती संपविण्याचे काम सरकार करू पाहत आहे. येथील नेते कोकणचा कॅलिफोर्निया करू असे एकीकडे सांगत आहेत तर असे विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचे वाळवंट करण्याचे काम सरकार करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.
अदानी, अंबानी यांना पोसण्यासाठी व कोकणातील माणसांचा बळी देण्याचा निर्धार मोदी, फडणवीस यांनी केला आहे मात्र हा विनाशकारी प्रकल्प होवू नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसभा, नगरपंचायत सभा या सभांमध्ये प्रकल्पविरोधी ठराव घेवून प्रकल्पविरोधी जनरेटा तयार करावा लागेल. कारण संपूर्ण कोकणच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे.अणुऊर्जा प्रकल्पामुळे येथील आंबा, काजू बागायती तसेच मत्स्यव्यवसायास धोका आहे. सत्ताधाऱ्यांचा आशिर्वादाने बेकायदेशीर मच्छिमारी सुरू आहे मात्र अशा पध्दतीने सुरू असलेल्या मच्छिमारी नौका बुडवाव्या लागतील असा इशारा शेट्टी यांनी दिला. येथिल आंबा बागायतदार,शेतकरी, मच्छिमार यांच्यावर अन्याय होत असेल तर छातीचा कोट करून उभे राहू. आपण येथे लोकांची माथी भडकविण्यासाठी आलो नसून त्यांना न्याय मिळावा यासाठी आलो आहोत.शेतकऱ्यांसाठी माझे सर्व आयुष्य मी समर्पित केले आहे..हिंदूचा कैवार घेवून फिरणाऱ्या सत्ताधारी नेत्यांनी बागायतदार मच्छिमार हे देखिल हिंदूच आहेत, याचे भान ठेवावे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पालकमंत्री नीतेश राणेंना लगावला.
आपल्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांविरोधात तडीपारी, गुन्हे दाखल करू नयेत, असे उच्च न्यायालयाने सरकारला ठणकावून सांगीतले आहे.सध्याची शासनव्यवस्था ही अदानी, अंबानीसाठी चालविलेली व्यवस्था असून एक दिवस आम्हीच तुम्हाला तडीपार करू असा इशारा शेट्टी यांनी दिला. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पापासून आपला विनाशकारी प्रकल्पविरोधी लढा सुरूच असून देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्या सांगण्यावरून देवगडमध्ये अणुउर्जा प्रकल्प आणण्याचा घाट घातला आहे. हे प्रकल्प आधी येत नाहीत तर जमीनी खरेदी करणारे दलाल प्रथम येतात. या दलालांवर प्रथम बहिष्कार टाका.आंबा बागायतदार व काजू बागायतदार यांना त्यांचा मागणीनुसार भरपाई दिली नाही, मात्र हा राजा उदार झाला आणि अणुउर्जासारखा करोडो रूपयांचा घातक प्रकल्प येथिल जनतेच्या माथी मारत आहे. घातक प्रकल्प आणण्यापेक्षा गारमेंटसारखे रोजगार उपलब्ध करून देणारे प्रकल्प का आणत नाही? असे सवाल करत त्यांनी सत्ताधारी व राणेंवर जोरदार टीका केली.
राणे यांचा धसका घेवू नका, शासन बदलवून टाकणारी आम्ही माणसे आहोत. हे अदानी,अंबानी यांना विकले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा लबाड मुख्यमंत्री बघितला नाही. कसल्या राणे स्टाईल सत्तेमध्ये आहात, तुमच्यात खरी ताकद असेल तर प्रकल्प रद्द करा,असे आव्हान महादेव जानकर यांनी राणें यांना केले.
राणे लोकांचा विश्वास गमावित चालले आहेत. एकीकडे बागायतदारांना तुटपुंजी मदत जाहीर केली आणि याचे श्रेय यांचे आमदार भाऊ घेत आहेत.तिन्हीही राणे जिल्ह्यात सत्तेत आहेत.त्यामुळे प्रकल्प होणार हा समज आपल्याला खोडून काढायचा आहे.लढाई सुरू झाली आहे.शिवसेनेची ताकद तुमच्या पाठीशी आहे.
अणुऊर्जा प्रकल्पाची एम्ओयू अदानी-अंबानी यांनी केली आहे. प्रकल्पाचा अनुषंगाने सर्व्हे सुरू होता, मात्र प्रशासनाला माहित नाही हे आश्चर्य आहे.अशा घातक प्रकल्पांनी येथील शेतकऱ्यांना भुमिहीन होवू देणान नाही.प्रसंगी प्रकल्प विरोधासाठी देवगडमध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही आणून हा प्रकल्प कायमचा हद्दपार करू .
मनसे पक्ष बागायतदार जनतेच्या पाठीशी असून सरकार आपल्या फायद्यासाठी असे प्रकल्प माथी मारत आहे. प्रकल्प विरोधी एकजुट अशीच ठेवा.मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखिल याबाबत दखल घेतील.
काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश गावकर, किरण टेंबुलकर यांनी विचार मांडले तर अणुउर्जा अभ्यासक मंगेश सावंत यांनी अणुउर्जा प्रकल्पाचे तोटे उपस्थितांसमोर मांडून या प्रकल्पाला ठाम विरोध करा असे आवाहन केले. या आंदोलनाला विविध संघटना, पर्यावरणवादी संघटना, काही राजकीय पक्षांनी पाठींबा दर्शविला होता.विविध संघटनांचे प्रतिनिधी, बागायतदार, शेतकरी, मच्छिमार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर.आपत्कालीन यंत्रणेसह,महसुल, पोलिस यंत्रणा प्रकल्पस्थळी ठाण मांडून होती.पोलिस अधिक्षक मोहन दहिकर,प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्यासह शासकीय यंत्रणेतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.मेळाव्यानंतर जलसमाधी आंदोलनासाठी जाणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी मिठमुंबरी समुद्रकिनारी चोख पोलिस बंदोबस्त ठेवून मानवी कडे तयार करण्यात आले होते.जलसमाधी आंदोलनासाठी जात असताना राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, वैभव नाईक, साक्षी वंजारे, आदी प्रमुख नेत्यांना पोलिसांनी रोखले. पोलिस अधिक्षक मोहन दहिकर व प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी जलसमाधी आंदोलनस्थळी जावू नये असे आवाहन या नेत्यांना केले. शेट्टी आणि राऊत यांनी आंदोलनकर्त्यांचा भावना जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी का उपस्थित राहील्या नाहीत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांचा निषेध केला.
जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनकर्त्यांसमोर येत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा पवित्रा संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी घेतला.मात्र आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहचवुन याच अधिवेशनात या मागण्यांची पुर्तता शासनाने करावी अन्यथा आंदोलने सुरूच राहतील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला व आंदोलन तात्पुरते स्थगित करावे असे आवाहन सर्व आंदोलनकर्त्यांना केले.प्रांताधिकारी कातकर यांनीही आपल्या भावना शासनापर्यंत पोहचवितो असे आश्वासन दिले. शुक्रवारी दुपारी २ वा. हे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले. सुत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले. प्रशांत शदे, तुषार पाळेकर, हेमंत वातकर,अजय नाणेरकर, गणेश वाळके, रामानंद वाळके,शरद परब,चंदन मामघाडी आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते.
सत्तेत असलो तरी जनतेसाठी रस्त्यावर उतरणार-विलास साळसकर
विनाशकारी प्रकल्प देवगडमध्ये प्रस्तावित आहे याची माहिती सर्वप्रथम हिंदळे व मुणगे सरपंच यांनी सर्वांसमोर आणली व लोकांना जागृत केले याबद्दल त्यांचे कौतूक व आभार. बागायतदारांना तुटपुंजी मदत जाहीर केली.सत्तेत असलो तरी जनतेसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवायाचा, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत.पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर ठरावी जणांना नोटीसा काढल्या.सगळयांनाच नोटीसा द्या. २०२० पासून आपत्ती काळात बेघर झालेल्या लोकांना शासनाने नुकसानभरपाई दिली नाही त्यामुळे हे सरकार आंबा बागायतदारांना काय नुकसानभरपाई देणार? अशी टीका साळसकर यांनी केली. आपण सत्तेत असूनही जनतेच्या बाजूने आहे, त्यामुळे माझ्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रारी करून कारवाई होईल. मात्र जनतेसाठी आपण कुठल्याही कारवाईला घाबरत नाही, असे साळसकर यांनी सांगीतले.