वैभववाडी : करूळ-गावठाण येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (६०) हे नदीपलिकडे असलेल्या शेतावर जाण्यासाठी नदी ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वा. च्या सुमारास घडली. सह्याद्री जीव रक्षक टीमच्या सदस्यांनी राबविलेल्या शोध मोहिमेनंतर तब्बल ८ तासाने घटनास्थळापासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला.
तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीला पूर आला होता. मंगळवारी सकाळी सदानंद कदम हे नदीपलीकडे असलेल्या शेतात जाण्यासाठी घरातून निघाले. नदी पार करताना त्यांचा पाय घसरला व ते पाण्यात पडले व वाहून गेले. ते शेतावर न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोधा सुरू केला. दरम्यान, करूळ गावातील सह्याद्री जीवरक्षक टीमनेही शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली. वैभववाडी पोलिस तसेच तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार दिलीप पाटील, मंडल अधिकारी श्री. गवस, तलाठी शुभांगी साबळे, ग्रामसेवक शशिकांत गुरव, पोलिस अधिकारी फकरुद्दीन आगा, पोलिस हवालदार सी. ए. माने, आर. बी. तळसकर, मोहन राणे, जितेंद्र कोलते, संदीप राठोड घटनास्थळी हजर होते.