कणकवली : उपजिल्हा रुग्णालयातील रक्त नमुने तपासणी कक्षाच्या बाहेरील भागातील सिलिंगचा काही भाग शनिवारी सायंकाळी अचानक कोसळला. नेहमी या भागात रक्त नमुना तपासणी व दंत तपासणीसाठी आलेले रूग्ण थांबलेले असतात. सुदैवाने त्यावेळी कक्षात कुणीही उपस्थित नसल्याने दुर्घटना टळली. मात्र, रूग्णालयाच्या या जुन्या इमारतीची पुनर्बांधणी अथवा दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे दिसून आले.
उपजिल्हा रूग्णालयाची ही जुनी इमारत सुमारे ५० वर्षापूर्वीची आहे. या इमारतीमध्ये सध्या अनेक तपासणी कक्ष आहेत. यातीलच असलेल्या रक्त नमुना तपासणी कक्ष व दंत तपासणी कक्ष यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेच्या वरील सिलिंगचा काही भाग शनिवारी सायंकाळी अचानक कोसळला. हे सिलिंगही बरेचसे जुने असून त्याच्या फ्रेमच्या लोखंडी पट्ट्याही गंजलेल्या आहेत. त्यामुळे जीर्ण झालेला या सिलिंगच्या काही सिमेंट प्लेटस् अचानक कोसळल्या. त्यानंतर उर्वरीत भागातील सिलिंगही काढून टाकण्यात आले. रूग्णालयातील याच इमारतीमध्ये असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कक्षाचे सिलिंग आठवड्याभरापूर्वी कोसळले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा त्याला लागुनच असलेल्या या कक्षाचे सिलिंग कोसळले आहे. त्यामुळे या संपूर्ण भागातील सिलिंग धोकादायक स्थितीत असल्याचे निष्पन्न होत आहे. रूग्णालय प्रशासनाकडून या इमारतीच्या देखभाल दुरूस्तीविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रूग्णालयात नेहमी रूग्ण व तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. नातेवाईकही मोठ्या संख्येने थांबलेले असतात. जुन्या इमारतीमध्ये बाह्य रूग्णांचे केसपेपर, औषध विभाग, नेत्र व दंत तपासणी व महत्वाची अशी रक्त नमुने तपासणी प्रयोगशाळा आहे. त्यामुळे सिलिंग व एकुणच इमारत ही सुसज्ज असणे आवश्यक असताना सिलिंग कोसळल्याने या इमारतीची पुनर्बांधणी अथवा योग्य पध्दतीने देखभाल दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.