मळगाव : दोन महिन्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि समुद्राच्या शांततेनंतर वेंगुर्ल्याच्या किनारपट्टीवर अखेर उत्साहाचे आणि जल्लोषाचे उधाण आले आहे. मासेमारी बंदीचा काळ संपताच नव्या उमेदीने समुद्रात उतरलेल्या मच्छीमारांवर सागराने जणू कृपेचा वर्षाव केला आहे. हंगामाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी त्यांच्या जाळ्यांमध्ये कोळंबीचा अक्षरशः खच पडल्याने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेचे सोने झाले आहे. या ‘बंपर’ सुरुवातीमुळे मच्छीमारांच्या चेहर्यावर समाधानाचे आणि आनंदाचे भाव स्पष्ट दिसत असून, संपूर्ण हंगाम भरभराटीचा जाण्याची आशा पल्लवित झाली आहे.
शुक्रवारी पहाटेच अनुकूल हवामानाचा संकेत मिळताच वेंगुर्ले तालुक्यातील मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रात लोटल्या. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळी जेव्हा नौका मांडवी खाडीत परतल्या, तेव्हा किनार्यावर एक वेगळेच चैतन्य पसरले होते. नौकांमधून मासळी उतरवण्याची, ती निवडण्याची आणि शीतगृहांच्या गाड्यांमध्ये भरण्याची लगबग सुरू होती. या अनपेक्षित आणि भरघोस कोळंबीच्या उत्पादनामुळे केवळ मच्छीमारच नव्हे, तर त्यावर अवलंबून असलेले इतर व्यावसायिकही सुखावले आहेत.
या ’बंपर’ सुरुवातीमुळे संपूर्ण हंगामासाठी मच्छीमारांच्या आशा उंचावल्या आहेत.दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मिळालेली ही ’पावस’ (पहिल्या हंगामातील मासळी) मच्छीमारांसाठी शुभसंकेत ठरली आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या या ’बरकती’मुळे संपूर्ण हंगाम असाच यशस्वी जाईल, हा विश्वास आता प्रत्येक मच्छीमार बांधवाच्या मनात घर करून आहे.