सिंधुदुर्ग : हा केवळ नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ नाही तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आहे. रोजगाराच्या संधी जिल्हयातच निर्माण केल्या जाणार असून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून सिंधुदुर्गचा एकही पात्र तरुण रोजगारापासून वंचित राहणार नाही, हा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग बँकेत निवड झालेल्या ७३ उमेदवारांना सोमवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक दिलीप रावराणे, स्मिता राणे, व्हिक्टर डाँटस, ॲड. प्रकाश बोडस, गजानन गावडे, समीर सावंत, रवींद्र मडगावकर आदी संचालक, नवनियुक्त कर्मचारी व त्यांचे पालक, अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, सिंधुदुर्ग बँक ही जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी, सहकार क्षेत्र, ग्रामीण अर्थचक्र आणि हजारो कुटुंबांचे जीवन या बँकेशी जोडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक नव्या कर्मचाऱ्याने स्वतःला केवळ कर्मचारी न समजता जिल्ह्याच्या विकासाचा भागीदार समजून प्रामाणिकपणे काम करावे. तुमच्या निर्णयांचा आणि सेवाभावाचा थेट परिणाम जिल्ह्याच्या प्रगतीवर होणार आहे. त्यामुळे या जबाबदारीचे भान ठेवून काम करावे वा जिल्हाच्या विकासाला येथील अर्थव्यवस्थेला चालना द्यावी. हा केवळ नियुक्तीपत्र वितरण समारंभ नाही तर या भरतीत आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या या नियुक्त होत असलेल्या उमेदवारांचा स्वागत समारंभ आहे. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच उमेदवारांची या भरतीत निवड झाली असून यात मोठे परिश्रम घ्यावे लागले. पाच वर्षांपूर्वी जिल्हा बँकेची सूत्रे स्वीकारताना सर्वात मोठा संकल्प होता तो म्हणजे भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणणे. नोकऱ्या शिफारशी, दबाव किंवा आर्थिक व्यवहारातून नव्हे, तर केवळ गुणवत्तेच्या आधारे मिळाल्या पाहिजेत, ही भूमिका आम्ही घेतली आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी केली असेही मंत्री राणे म्हणाले. ही भरती प्रक्रिया नामवंत आयबीपीएस या शासनमान्य एजन्सीमार्फत झाली आहे. कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाला नाही. आज तुमच्या हातात आलेले नियुक्तीपत्र हे कोणाच्याही शिफारशीमुळे नव्हे, तर तुमच्या गुणवत्तेमुळे मिळाले आहे. त्यामुळे या विश्वासाचे रूपांतर उत्कृष्ट सेवेत करा, असे आवाहन त्यांनी केले.
सिंधुदुर्गातील अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळावा, हा आमचा ध्यास असून ही भरती इथेच थांबणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी दुसरी आणि तिसरी भरती प्रक्रियाही लवकरच होणार असल्याचे सांगितले. यावेळी संधी न मिळालेल्या पात्र उमेदवारांनी निराश न होता पुढील टप्प्यांसाठी तयारी ठेवावी. जिल्ह्यात नवीन उद्योग, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्याच्या भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे येथील तरुणाई. त्यांच्या हाताला काम मिळाले, तर सिंधुदुर्गचा विकास अधिक वेगाने होईल, असे सांगत नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सेवाभाव जपत जिल्हा बँकेची विश्वासार्हता अधिक उंचवावी, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी प्रास्ताविकामध्ये भरती प्रक्रिया बँकेचे कामकाज, बँकेचे विश्वासार्हता, बँकेचा विकास व जिल्ह्यातील बँकिंग सेवेचे आदर्श जाळे याबाबत माहिती दिली.