कुडाळ : कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी वृद्धाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बापू कुबल (67, रा.दाभोली- तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी या वृद्ध पादचार्याचे नाव आहे.डंपरची धडक बसल्यानंतर ते रस्त्यावर पडून डंपरच्या चाकाखाली सापडले. त्यांच्या उजव्या हातावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा हात पूर्णतः निकामी झाला आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. हा अपघात गुरुवारी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास झाला.
अपघातानंतर शहरातून होणार्या वाळू डंपर वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच जखमीला कुडाळमधून गोव्याला हलविण्यासाठी डायल 108 क्रमांक रुग्णवाहिका टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यात आला असता, डायल 108 क्रमांक रुग्णवाहिका महनीय व्यक्तींच्या दौर्यात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर ग्रामीण रुग्णालयाच्या डायल 102 क्रमांक रुग्णवाहिकेने जखमीला गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले.
पोस्ट ऑफिस चौकात रस्ता ओलांडणारे सुभाष कुबल यांना गोवा येथून मालवणच्या दिशेने जाणार्या डंपरची धडक बसली. यात कुबल रस्त्यावर पडले, त्यांच्या हातावरून डंपरचे पुढील चाक गेले. यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. दोन्ही हात व डोक्यालाही दुखापत झाली. मात्र सुदैवाने ते बालंबाल बचावले. स्थानिक रिक्षा व्यावसायिक आणि नागरिकांनी त्यांना लागलीच नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आल्याची माहिती पोलिस व ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक निलेश परब, गणेश भोगटे, सुनील बांदेकर, चंदू वालावलकर, प्रसन्ना गंगावणे, संजय भोगटे, विनोद शिरसाट यांच्यासह नागरिकांनी रूग्णालयात धाव घेत, जखमीला उपचारासाठी तसेच नातेवाईकांचा शोध घेण्यास सहकार्य केले.
घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भांड, देवानंद माने, फ्रिडन बुथेलो व नारायण गंगावणे यांनी धाव घेत पंचनामा केला. तसेच डंपरसह चालकाला ताब्यात घेत, पुढील कार्यवाहीसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. जखमी कुबल यांच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डमुळे त्यांची ओळख पटली. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या अपघातामुळे तीनही रस्त्यांवर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.