घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला लुटले; सोन्याची चेन, मंगळसूत्र लंपास pudhari photo
सिंधुदुर्ग

घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला लुटले; वायंगणी-देऊळवाडीतील घटना

सिंधुदुर्ग : सोन्याची चेन, मंगळसूत्र लंपास

पुढारी वृत्तसेवा

आचरा : वायंगणी-देऊळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या घरात घुसून चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला लुटल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास घडली. खाण्याची सुपारी मागण्याचा बहाणा करत घरात घुसलेल्या दोन चोरट्यांनी वृद्धाला धाक दाखवत मारहाण करत जमिनीवर पाडून त्यांच्या अंगावरील दोन सोन्याच्या चेन व पत्नीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र खेचून घेत चोरटे पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच आचरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा माग घेण्यासाठी डॉगस्कॉड तसेच ठसेतज्ज्ञही दाखल झाले होते पण चोरांचा मागमूस लागला नाही. वायंगणी-देऊळवाडी येथील रस्त्यानजीक असलेल्या घरात सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर (७७) व त्यांची पत्नी सुप्रिया साळकर (७०) राहतात.

दामोदर साळकर हे सकाळी तुलशी वृंदावनास अगरबत्ती लावून घरात येत असताना दोन अज्ञात इसम अंगणात येत खाण्याची सुपारी मागू लागले. आपण दारातून घरात प्रवेश करत असताना त्या दोघांनी पाठीमागून धक्का देत दामोदर यांना त्यांनी आत ढकलले. त्यानंतर एकाने रुमालाने तोंड बांधण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केला असता त्यांना जमिनीवर पाहून धक्काबुक्की करत गळ्यातील सोन्याच्या तीन चेन खेचून काढल्या. तर समोर बसलेल्या त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुसऱ्या चोरट्याने ओढून पळ काढला. साळकर यांनी आरडाओरडा केल्यावर त्या दोन चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. मंगळसूत्र व तीन चेन मिळून साळकर यांचा सुमारे पाच तोळ्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

चोरटे काळ्या स्प्लेंडरवरुन गावात शिरले

चोरटे हे काळ्या स्प्लेंडरवरुन गावात शिरले होते. रस्त्यावरून चालत जाणारे ग्रामस्थ बापू सावंत यांनी त्याना पाहिले होते. सदर दुचाकीवर एक जाडा आणि एक किरकोळ शरीरयष्टीचे इसम असल्याचे बापू सावंत यांनी सांगितले. चोरी करून पासर झालेले चोरटे हे आतील मार्गातून आचरा दिशेने गेले असल्याचे बोलले जात आहे. चोरीची मिहिती मिळताच आचरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि सागर खंडागळे, पोलिस कर्मचारी मीनाक्षी देसाई, सुदेश तांबे, महिला पोलिस तांबे, मनोज पुजारे यांसह सरपंच रुपेश पाटकर, सदा राणे, चंदू सावंत, सचिन रेडकर यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेतली होती. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आचरा वायंगणी किनारपट्टी तसेच आतील मार्गावर शोधमोहीम राबवली, परंतु चोरटे सापडले नाहीत.

यावेळी साळकर म्हणाले, १५ दिवसापूर्वी मध्यरात्री आपल्या घराबाहेर कोणतरी इसम वावरत असल्याचा आवाज आला होता. त्यावेळी दर्शनी भागाची लाईट लावून जोरात कोण आहे रे ओरडून विचारले असता बाहेर उभ्या असलेल्या इसमांनी पळ काढला होता. त्यांनी आणलेले मोठे डिसमिस खाली फरशीवर पडलेले आढळून आले होते. यानंतर १५ दिवसांनी ही चोरीची घटना घडली आहे.

आचरा पंचक्रोशीतील चोऱ्यांचे सत्र सुरूच

जानेवारी महिन्यात आचरा मारुती घाटी येथे वृद्ध व्यक्तीला घरात घुसून लुटण्याची घटना घडली होती. यावेळीही चोरटे दुचाकीवरून आले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात भरदिवसा आचरा बाजारपेठेतील सोन्याच्या दुकानातील लाखो रुपयाचे दागिने चोरट्यानी दुचाकीवरून येत लंपास केले होते. यातील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या चोरीला काही दिवस उलटल्यानंतर आचरा ग्रामपंचायतचे आचरा-देवगड मुख्य रस्त्यावरील ६५ हजाराचे सौरपथदीप चोरीला गेले होते. त्यानंतर आता वायंगणी गावात साळकर यांच्या घरी चोरी झाली आहे. या साऱ्या चोरीतील चोरट्यांचा कोणताच थांगपत्ता लागलेला नाही. दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी दाखल

आचरा पोलिसांनी चोरीची घटना घडल्यानंतर तपासाची सूत्रे हाती घेतली. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे व श्वानपथकाची टीम दाखल झाली होती. अधिकारी कांबळे यांनी साळकर दांपत्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. अज्ञात दोन चोरट्यांवर आचरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT