बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय येथे सोनाली चेंदवणकर हिचा सत्कार करताना मान्यवर. Pudhari Photo
सिंधुदुर्ग

क्रिकेटपटू कपिलदेव सारखे निर्भय बनून यश मिळवा : डॉ. एम. बी. चौगले

'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत परिसंवाद

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" सारखे राष्ट्रीय उपक्रम महाराष्ट्रात राबविले गेले तर मोबाईलचा वापर कमी प्रमाणात होऊन पुस्तकांचे वाचन, संग्रह निश्चितच वाढतील. ज्ञानेश्वरीमुळे माझ्या जीवनात आज मोठा बदल झाला आहे. आपल्या प्रगतीसाठी पुस्तके, वर्तमानपत्रे, ग्रंथ यांचे आवर्जून वाचन करा. ज्याप्रमाणे सन 1983 साली क्रिकेट विश्वचषकामध्ये भारताचे कर्णधार कपिलदेव यांनी निर्भयतेने भिडून आपल्या असामान्य कर्तृत्वाद्वारे भारताला प्रथम विश्वचषक मिळवून दिला, त्याचप्रमाणे आपणही निर्भयतेने कार्यरत राहून आपली प्रगती करा, असे प्रतिपादन बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांनी आज बुधवारी वेंगुर्ले येथे केले.

वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या वतीने आज बुधवारी (दि.15) सकाळी बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय येथे 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' या उपक्रमांतर्गत परिसंवाद या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. खर्डेकर महाविद्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक शेखर सामंत ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' उपक्रमाच्या चेअरमन डॉ. मनीषा मुझुमदार, ज्येष्ठ पत्रकार भरत सातोसकर ,वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष योगेश तांडेल, दिपेश परब, महेद्र मातोंडकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, सिंधुदुर्ग एनसीसी बटालियनचे अधिकारी सुभेदार शाहू ,सीएचएम राकेश पटेल, प्रा.डॉ. सचिन परूळकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पत्रकार सामंत म्हणाले, आज वाचन संस्कृती वाढण्यासाठी बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय निश्चितच स्तुत्य असे कार्यक्रम राबवित आहे. आत्मविश्वास, मेहनत, अपार कष्ट , प्रामाणिकपणा व नम्रता हे गुण अंगी बाणवून आपल्या क्षेत्रात कार्यरत रहा. मोबाईलचा आवश्यक तेवढाच उपयोग करून वर्तमानपत्रे, पुस्तके, ग्रंथ, साहित्य, विविध थोर व्यक्तींची चरित्रे यांचे वाचन करा. आई - वडील ,आजी - आजोबा, ज्येष्ठ व्यक्ती तसेच आपल्या शिक्षकांचा आदर करा त्यामुळे निश्चितच आपले चांगले भवितव्य घडून समाजात आदर्श प्रस्थापित कराल.

यावेळी संपादक शेखर सामंत , जिल्हा पुरस्कार प्राप्त भरत सातोसकर , आर्मी डे निमित्ताने सुभेदार साहू , राकेश पटेल , दिल्ली येथे थलसेना कॅम्प मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या सोनाली चेंदवणकर, दिव्या दळवी इत्यादींचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंडियन आर्मी डे निमित्त लेफ्ट.बी.जी.गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत डॉ.एम.बी. चौगले, प्रास्तविक डॉ. मनीषा मुजुमदार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर व डॉ. पी. आर. गावडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT