दोडामार्गमध्ये वाघिणीसह बछड्यांच्या पाऊलखुणा! 
सिंधुदुर्ग

Sahyadri Tiger Reserve : दोडामार्गमध्ये वाघिणीसह बछड्यांच्या पाऊलखुणा!

सह्याद्रीत व्याघ्र प्रजननाचे मोठे संकेत

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग ः वन्यजीव प्रेमींसाठी सह्याद्रीच्या डोंगरांगांमध्ये एक सुखद अशी बातमी समोर आली आहे. दोडामार्ग तालुक्यातील या डोंगर रांगांमध्ये वाघिणीसह तिच्या बछड्यांच्या पाऊलखुणा स्पष्टपणे आढळल्या असून, या भागात वाघांचे वास्तव्य नियमित असल्याचे संकेत मिळाले आहेत. बछड्यांची उपस्थिती ही त्या परिसरात नैसर्गिक प्रजनन सुरू असल्याचे दर्शवणारी महत्त्वाची बाब मानली जाते.

दर चार वर्षांनी अखिल भारतीय व्याघ्रगणना होते. या वर्षीच्या व्याघ्र गणनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघांच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे समोर आले आहेत. यापूर्वी अधूनमधून वाघांचे दर्शन होत असले, तरी यावेळी पाऊलखुणा, विष्ठा आणि कॅमेरा ट्रॅपमधील नोंदींमुळे त्यांच्या अधिवासाबाबत अधिकृत खात्री समोर आली आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील जंगल पट्ट्यात बसविण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांच्या हालचाली स्पष्टपणे टिपल्या गेल्या आहेत. वन विभागाने या पार्श्वभूमीवर संबंधित भागात गस्त वाढवली आहे.

सिंधुदुर्ग आणि तिलारी परिसरात शेकडोहून अधिक कॅमेरे तैनात करण्यात आले असून, तिलारीत प्रथमच वाघिणीसह तिच्या बछड्यांच्या पाऊलखुणांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, 2014 पासून या परिसरात सातत्याने वाघांच्या अस्तित्वाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या जंगल पट्ट्याचे महत्त्व अधिक ठळक झाले आहे.

नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटीच्या अहवालानुसार, महाराष्ट्र-गोवा सीमावर्ती हा भाग वाघांच्या स्थलांतरासाठी अत्यंत महत्त्वाचा ‌‘कॉरिडॉर‌’ आहे. गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्य आणि महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा हा नैसर्गिक दुवा असल्याने या पट्ट्याचे पर्यावरणीय स्थान अधिक महत्त्वाचे ठरते. सिंधुदुर्गातील वाघाच्या या नव्या नोंदी वाघांच्या संख्यावाढीला पुष्टी देणाऱ्या आहेत. वाघांच्या वाढत्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्राला कायदेशीर दर्जा देऊन ‌‘व्याघ्र प्रकल्प‌’ म्हणून घोषित करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे. वन विभाग वाघांच्या संरक्षणात्मक उपाययोजना राबवत असून, मानववन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती आणि सतर्कता वाढवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT