‘दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त‌’ होईपर्यंत ‌‘ठिय्या‌’ मागे घेणार नाही!  
सिंधुदुर्ग

Sindhudurg Farmer Protest‌ : ‘दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त‌’ होईपर्यंत ‌‘ठिय्या‌’ मागे घेणार नाही!

स्वराज्य सरपंच सेवा संघटना व शेतकऱ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील हत्ती प्रश्न गंभीर बनला असून गेल्या 23 वर्षांपासून केवळ आश्वासनांचीच पेरणी होत आहे. आता आश्वासन नकोत, प्रत्यक्ष कृती हवी. हत्तीच्या सततच्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागला असून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत. ही आमची अखेरची लढाई असून ‌‘दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त‌’ होईपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी घेतल्यानेे हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू होते.

येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर बुधवारी आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला तरी ठिय्या आंदोलन सुरूच होते. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय देसाई, तुकाराम बर्डे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. वनविभाग व शासनाने आतापर्यंत अनेकदा आश्वासने दिली. मात्र दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा बंदोबस्त किंवा पकड मोहीम अद्याप सुरू झालेली नाही. दिलेली सर्व आश्वासने हवेतच विरली आहेत. हत्ती प्रश्नासंदर्भात शेकडो आंदोलने झाली, प्रत्येक वेळी आश्वासनांची पुनरावृत्ती झाली. परंतु प्रत्यक्षात काहीच घडले नाही. त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सोमवारी ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली. श्री. गवस म्हणाले, आता आर-पारची लढाई असून, जोपर्यंत प्रत्यक्ष हत्ती हटाव किंवा पकड मोहीम सुरू होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

अन्यथा वन कार्यालयाला टाळे ठोकणार

आंदोलनकर्ते प्रवीण गवस यांनी इशारा देताना सांगितले की, आंदोलनाचा चौथा दिवस असलेल्या गुरुवारी सकाळी 10 वा. पर्यंत प्रत्यक्ष हत्ती हटाव किंवा पकड मोहिमेला सुरुवात झाली नाही, तर दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल. यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी वन विभाग जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT