Sindhudurg News 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलांची हेळसांड

ठाकरे शिवसेनेने विचारला वैद्यकीय अधिकऱ्यांना जाब

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : येथील ग्रामीण रुग्णालयातील मनमानी कारभारामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचा संतापजनक प्रकार पुन्हा समोर आला आहे. गुरुवारी गरोदर महिलांसाठी ठरलेल्या सोनोग्राफी सेवेचा अक्षरशः बोजवारा उडाला. याची माहिती ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी तत्काळ सोनोग्राफी तज्ज्ञांना रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या.

तालुक्यातील गरोदर महिलांची सोनोग्राफी सुविधाअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने सुमारे ४० लाख रुपये खर्च करून मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. रुग्णालयात दर गुरुवारी गरोदर महिलांची तपासणी केली जाते. मात्र संबंधित सोनोग्राफी तज्ज्ञ गुरुवारी अनुपस्थित राहिल्याने अनेक गरोदर महिलांना रुग्णालयात दिवसभर ताटकळत बसल्या होत्या. आधीच अपुऱ्या सुविधांमुळे त्रस्त रुग्णांना या प्रकारामुळे आणखी मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकाराची माहिती मिळताच ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी थेट रुग्णालयात धडक देऊ प्रशासनाला जाब विचारला. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्‍त तसेच संबंधित प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर श्रीपाद पाटील यांनी तात्काळ सोनोग्राफी तज्ज्ञांना रुग्णालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा कुचकामी ठरल्याचा आरोप श्री. धुरी यांनी केला. गरोदर महिलांसारख्या संवेदनशील रुग्णांची अशी हेळसांड होणे गंभीर बाब आहे, भविष्यात आरोग्य सेवेत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी देत रुग्णांना वेटीस धरणाचे प्रकार यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने तत्‍काळ सुधारणा कराव्यात, अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बाबुराव धुरी यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT