राजेंद्र म्हापसेकर  pudhari photo
सिंधुदुर्ग

दोडामार्ग पोलिसांकडून गोमंतकीयांना नाहक त्रास

पोलिस अधीक्षकांनी कर्मचार्‍यांना समज द्यावी

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला आहे. त्यामुळे लगतच्या गावातील अनेक गोमंतकीय दोडामार्ग शहरात बाजारात येत असतात. मात्र अलीकडच्या काही दिवसांत दोडामार्ग पोलिसांकडून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ती समज देण्यात यावी, अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केली आहे.

राजेंद्र म्हापसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गोव्यातील काही युवकांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली ती योग्य नाही. अशाप्रकारे जर पोलिसांनी आपली मुजोरी केली तर येथील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात दिवाळी सणाच्या आदल्या दिवशी नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतीमा तयार करण्यात येतात व त्याच दिवशी रात्र जागवून सकाळी नरकरासुराचे दहन केले जाते.

या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजाररहाटासाठी येतात. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून त्यांना मारहाण करणे योग्य नाही. आमच्या भागातील युवकही कामानिमित्त गोव्यात जातात. तेथील लोकांनीही किंवा पोलिसांनी आपल्या भागातील युवकांना अशाप्रकारे वागणूक दिल्यास त्यांना दोष देण्यात येऊ नये, असेही म्हापसेकर म्हणाले.

अवैध धंद्याकडे कानाडोळा !

तालुक्यात राजरोसपणे अवैध दारू विक्री, मटका, जुगार हे धंदे सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील पोलिस जर एवढेच कर्तव्यदक्ष असतील तर त्यांनी याआधी हे सर्व धंदे बंद करावेत. काही पोलिसांना दोडामार्ग तालुका आर्थिक प्राप्तीचे कुरण बनले आहे. त्यामुळे अशा पोलिसांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे म्हापसेकर म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT