Dodamarg mayor beaten
दोडामार्ग पोलिस ठाण्यात जप्त करून आणलेल्या दुचाकी. file photo
सिंधुदुर्ग

दोडामार्ग नगराध्यक्षांना पर्यटकांकडून मारहाण

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : मांगेली धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी आलेल्या बेळगाव (कर्नाटक) येथील काही हुल्लडबाज पर्यटकांनी स्थानिक युवकांना शिवीगाळ केली. या गैरप्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी गेलेले दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या मित्रांना हुल्लडबाजांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात नगराध्यक्ष चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना म्हापसा गोवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी बेळगाव येथील पर्यटकांचा एक ग्रुप सोमवारी संध्याकाळच्या सुमारास आला होता. हे पर्यटक बेशिस्त वर्तन व हुल्लडबाजी करत होते. याच दरम्यान दोडामार्गमधील शुभम मुळगावकर व अन्य दोघे युवकही मांगेलीत गेले होते. त्या हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यातील एकाने मुळगावकर यांच्यावर दुचाकी आणून मारली. याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या समीर रेडकर, शुभम मळगावकर व सागर नाईक यांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. हुल्लडबाज पर्यटकांनी तिघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात नगराध्यक्ष चेतन चव्हाण, त्यांचे मित्र लक्ष्मण कवठणकर व पराशर सावंत हे गंभीर जखमी झाले. यावेळी मांगेलीमधील काही स्थानिक मदतीसाठी धावून येताच हल्लेखोरांनी आपल्या दुचाकी तेथेच सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. चव्हाण सध्या म्हापसा येथील व्हिजन रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर हल्लेखोरांच्या एकूण सहा दुचाकी दोडामार्ग पोलिस ठाण्यात जप्त करून ठेवण्यात आल्या आहेत.

पर्यटक नशापानमध्ये

मारहाण करणारे पर्यटक हे नशा करून आले होते, असा आरोप करत या नशेखोर व हुल्लडबाज पर्यटकांविरोधात नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दहा ते बारा अज्ञात इसमांनी मारहाण करून समीर रेडकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांच्यापैकी बॉडीबिल्डर असलेल्या एका इसमाने हातात दगड घेऊन चव्हाण यांच्या डोक्यावर व नाकावर मारून दुखापत केली, अशी फिर्यादी दिली आहे. यावरून हुल्लडबाज दहा ते बारा अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.

SCROLL FOR NEXT