जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे 
सिंधुदुर्ग

‘एआय’च्या माध्यमातून प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

पथदर्शी पर्यटन प्रकल्प राबविण्याचा मनोदय

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : प्रशासकीय कारभारात ‘एआय’चा वापर करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान करण्याचा आपला प्रयत्न असेल. तसेच सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यात पर्यटनावर आधारित पथदर्शी प्रकल्प राबविण्यास प्राधान्य देण्यात येईल. प्रलंबित विकासकामांना गती देऊन प्रशासन लोकाभिमुख पद्धतीने चालविण्यात येईल, अशी माहिती नवनियुक्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी म्हणून तृप्ती धोडमिसे यांनी रविवारी पदभार स्वीकारल्या. त्यानंतर सोमवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे व अन्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या, जिल्ह्याचे सामाजिक, सांस्कृतिक व भौगोलिक वैशिष्ट्य लक्षात घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रशासन आणि लोकसहभाग या दोन्हींचा समन्वय साधूनच जिल्ह्याच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करता येईल. पत्रकार हे समाजाचे डोळे व कान असून त्यांनी दाखवलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जाईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन कल्चर आणि सांगली जिल्ह्याचे कल्चर यामध्ये बराच फरक आहे. आपण सांगली जि. प. मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक म्हणून काम पाहिल. खरेतर लोकनियुक्त पदाधिकार्‍यांसमवेत काम करताना ग्रामीण भागातील प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून समजू शकतात. केवळ प्रशासक म्हणून सर्वच प्रश्न गांभीर्याने सोडविण्यास कळत नाहीत. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यात यापूर्वी आपण दोन वेळा येऊन गेले आहे. येथील प्रशासकीय कामकाजाची माहिती समजून घेईन, ‘एआय’ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे काम करताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घेऊन काम केले जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निर्सग सौदर्य जपणारा एखादा नवीन पर्यटन पायलट प्रकल्प राबवण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT