आदित्य ठाकरे, दीपक केसरकर (File Photo)
सिंधुदुर्ग

Dipak Kesarkar Vs Aditya Thackeray | एकही रुपया घेतल्याचे सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास

Aditya Thackeray Allegations | आदित्य ठाकरेंच्या आरोपाला आ. केसरकर यांचे प्रत्युत्तर; त्यांचे बोलणे म्हणजे पोरकटपणा

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : आदित्य ठाकरेंचा बोलणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशी त्यांची स्थिती आहे, अशा शब्दांत आ. दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मी मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदारांकडून एक रुपया घेतल्याच कोणी सिद्ध केल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान त्यांनी दिले. माझी बांधीलकी माझ्या जिल्ह्याशी आणि माझ्या तत्त्वांशी आहे. मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी माझ्या अंगावर आले तर त्याला सोडत नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ठाकरे शिवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी केसरकर हे शिक्षणमंत्री असता झालेल्या गणवेश वाटप व्यवहारावर शंका उपस्थित करत टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आ. केसरकर म्हणाले, यापूर्वी फक्त मागासलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत होते, पण मी मंत्री असताना सर्वांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला. पुस्तकांचे ओझे कमी केले. नवीन प्रयोग करताना काही त्रुटी राहू शकतात, पण चांगल्या दर्जाचा गणवेश आम्ही दिला. गणवेशाची ती एक आदर्श योजना होती, पण आदित्य ठाकरेंना त्यात पोरकटपणा दिसतोय.

राज ठाकरेच बाळासाहेबांचे वारसदार!

राज ठाकरे यांच्या मराठी भाषेवरील भूमिकेबद्दल बोलताना आ. केसरकर म्हणाले, राज ठाकरे नेहमी मराठीसाठी आवाज उठवतात आणि ते बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे नेत आहेत. पण ज्यांनी मुंबईतील मराठी शाळा इंग्रजी माध्यमाच्या केल्या, त्यांना मराठीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. माझ्यासारखे काम शिक्षण क्षेत्रात कोणी केले असेल तर दाखवा, नाहीतर मी राजकीय जीवनातून दूर होतो.

ठाकरेंनी माझा ‘Use And throw’ वापर केला....

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना आ. केसरकर म्हणाले, नारायण राणेंच्या दहशतीमुळे ठाकरे कुटुंबीयांच्या गाड्यांना सिंधुदुर्गात पेट्रोल मिळत नव्हते आणि त्यांना राहायला जागाही मिळत नव्हती. बाळासाहेबांचा मुंबईत दरारा होता, पण सिंधुदुर्गातून त्यांना गोव्यात जावे लागत होते. त्यावेळी जिल्ह्यात कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही, पण मी त्यांच्यासाठी संघर्ष केला. मात्र, त्यांनी माझा ‘‘Use And throw’’ प्रमाणे वापर केला.

माझा राणेंशी कोणताही वैयक्तिक वाद नव्हता, पण कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे ठाकरेंनी माझ्यावर उगाच आरोप करू नयेत, असा इशारा दिला. आपली बांधिलकी सिंधुदुर्ग जिल्हा आणि तत्त्वांशी असल्याचे दिपक केसरकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर अधिक स्पष्ट बोलेन

लोकांचा गैरसमज करून पायर्‍यांवर बसून केलेले आरोप मी सहन करणार नाही. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मागितली असून, त्यांची परवानगी मिळाल्यावर अधिक स्पष्टपणे बोलेन, मी कोणालाही घाबरत नाही, असे त्यांनी सांगितले.

मी बोलेन तेव्हा ठाकरेंना पश्चात्तापाची वेळ येईल

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना आ. केसरकर म्हणाले, मी उद्धव ठाकरेंचा नेहमी आदर केला आहे. पण, ज्यावेळी मी बोलायला सुरुवात करेन, तेव्हा त्यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. त्यांच्या फालतू आरोपांना मी तिथेच उत्तर देऊ शकलो असतो, पण ठाकरे घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी थांबलो. याबद्दल मी लवकरच वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. शिक्षण खात्यात मी चांगले काम केले आहे आणि मराठी भाषेला न्याय दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT