देवगड : ‘हर हर महादेव’ आणि ‘ओम नम: शिवाय’च्या अखंड जयघोषात, श्री देव कुणकेश्वराच्या नामगजराने अवघे श्रीक्षेत्र कुणकेश्वर दुमदुमून गेले. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी, ’दक्षिण कोकणची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्री शिवशंभोच्या दर्शनासाठी भाविकांचा अक्षरशः महासागर लोटला होता. श्रद्धेच्या या लाटांनी केवळ मंदिर परिसरच नव्हे, तर संपूर्ण आसमंत भक्तिमय करून सोडले.
प्रारंभ 28 जुलै रोजी झाला. यावर्षीच्या पहिल्या पूजेचा मान मालवणचे प्रसिद्ध उद्योजक सुरेश नेरूरकर आणि कुडाळचे उद्योजक आनंद शिरवलकर यांना मिळाला. त्यांच्या हस्ते विधिवत महापूजा संपन्न झाल्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनाचे दरवाजे खुले करण्यात आले. दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा हे शिवभक्तीचे चैतन्यमय प्रतीक ठरल्या. देवस्थान ट्रस्टने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता आले.
राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या असंख्य शिवभक्तांनी कुणकेश्वरचरणी लीन होत श्रावण महिन्याची मंगलमय सुरुवात केली. एस.टी. प्रशासनानेही भाविकांसाठी विशेष बससेवा पुरवून या सोहळ्याच्या यशस्वीतेत मोलाचा हातभार लावला. हा दिवस म्हणजे शिवभक्ती आणि उत्तम नियोजनाचा एक अविस्मरणीय सोहळा ठरला.
या दिवशी केवळ दर्शनच नव्हे, तर सेवेचाही अनोखा संगम पाहायला मिळाला. उद्योजक सुरेश नेरूरकर यांच्याकडून हजारो भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले, तर रामेश्वर प्रतिष्ठान (भाई नरे मित्रमंडळ) तर्फे खिचडी वाटप करून शिवभक्तांची सेवा करण्यात आली. दिवसभर सुप्रसिद्ध भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनांनी वातावरणात अधिकच चैतन्य भरले होते.
हर हर महादेव’च्या जयघोषात राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो भाविक दाखल.
मानाची पहिली पूजा: उद्योजक सुरेश नेरूरकर व आनंद शिरवलकर यांच्या हस्ते महापूजा संपन्न.
दर्शनासाठी सुलभ रांगा आणि एस.टी. महामंडळाकडून विशेष बससेवा.