अवकाळी पावसाचा देवगड हापूसला फटका Pudhari
सिंधुदुर्ग

Devgad unseasonal rain | अवकाळी पावसाचा देवगड हापूसला फटका; उत्‍पादकांची चिंता वाढली

यंदा सुरुवातीपासूनच हवामानातील बदलांमुळ आंबा उत्‍पादनावर विपरीत परिणाम

पुढारी वृत्तसेवा

देवगडः देवगड तालुक्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या रिमझिम अवकाळी पावसाने हापूस आंबा उत्पादकांची चिंता वाढवली आहे. यंदा सुरुवातीपासूनच हवामानातील बदल, उष्णतेची लाट, ढगाळ वातावरण आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादनात मोठी घट झाली असून केवळ 10 टक्केच आंबा पीक हाती आले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेवटच्या टप्प्यात असलेल्या आंबा हंगामाला आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

देवगड तालुक्यातील अनेक भागांमध्ये सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन ढग दाटून आले आणि रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे झाडांवर तयार असलेल्या हापूस आंब्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे. विशेषतः या काळात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. तसेच आंब्यावर काळे डाग पडणे, फळ कुजणे, गळ होणे आणि फळांची प्रत खराब होणे अशा समस्या निर्माण होतात. परिणामी निर्यातीसाठी व बाजारपेठेसाठी योग्य असलेला दर्जेदार आंबा कमी होण्याची शक्यता आहे.

यंदा आधीच कमी उत्पादनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या आंबा बागायतदारांना या पावसामुळे आणखी मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. अनेक बागायतदारांनी हंगामाच्या सुरुवातीपासून मोठ्या खर्चाने बागांचे व्यवस्थापन केले होते. मात्र उत्पादन कमी मिळाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. आता शेवटच्या टप्प्यातील आंबाही खराब होण्याची भीती निर्माण झाल्याने बागायतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

देवगड हापूस हा देश-विदेशात प्रसिद्ध असलेला आंबा असून त्याच्या गुणवत्तेमुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र सतत बदलणारे हवामान, अवकाळी पाऊस आणि वाढते नैसर्गिक संकट यामुळे हापूस उत्पादन धोक्यात येत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT