देवगड-जामसंडे नगरपंचायत (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Devgad News | मोकाट गुरे ताब्यात घेण्यास दहा दिवसांची डेडलाईन!

Stray Cattle Action | अन्यथा अशा गुरांचा थेट लिलाव करण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

  • मोकाट गुरांच्या प्रतिबंधासाठी न. पं. अ‍ॅक्शन मोडवर

  • पकडलेल्या प्रत्येक गुरामागे प्रतीदिन 1 हजार रु. दंड आकारणार

  • मोकाट गुरे फक्त दहा दिवस सांभाळणार

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट गुरांचा विषय चांगलाच गाजला. न. पं.ने पकडलेल्या मोकाट गुरांवर प्रत्येक गुरामागे प्रतिदिनी 1 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच पकडलेली मोकाट गुरे दहा दिवसांत मालकांनी न नेल्यास त्या गुरांची लिलाव करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला.

देवगड-जामसंडे न. पं.ची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. उपनगराध्यक्षा मिताली सावंत, प्रभारी मुख्याधिकारी गौरी पाटील (कणकवली), न. पं. बांधकाम सभापती शरद ठुकरूल, स्वच्छता सभापती आद्या गुमास्ते आदी उपस्थित होते. न. पं. ने देवगड-जामसंडे कार्यक्षेत्रातील मोकाट गुरांवर कारवाई करण्याची मोहीम राबविली असून यामध्ये रस्त्यावर फिरणार्‍या 20 मोकाट गुरांना पकडण्यात आले. त्यापैकी 19 गुरे संबंधित गुरेमालकांनी दंड भरून नेली असल्याची माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू व स्वच्छता समिती सभापती आद्या गुमास्ते यांनी दिली.

यावेळी संबंधित गुरेमालकांना प्रत्येक मोकाट गुरांसाठी 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. यावर हा दंड अल्प असल्याने संबंधित मालक गुरे पुन्हा मोकाट सोडत आहेत. मोकाट फिरणार्‍या गुरांमुळे परिसरात शेतीचे नुकसान होत आहेत. तसेच ही मोकाट गुरे अपघातांनाही निमंत्रण देत आहेत. देवगड, जामसंडे शहरात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला असून या गुरांचा मालकांना किती दिवस समजून घेणार?, असा सवाल नगरसेवक संतोष तारी यांनी केला. यावर संबंधित गुरेमालकांवर कायदेशीर करावी.

गुरे मालकांवर न्यायालयामार्फत कारवाई करण्यासाठी न. पं. प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी सूचना नगरसेवक संतोष तारी यांनी केली. न. पं. प्रशासनाला गुरेमालक सहकार्य करीत नसून त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी सूचना व्ही. सी. खडपकर, सुधीर तांबे यांनी केली. न. पं. कार्यक्षेत्रात रस्त्यांवर मोकाट गुरे सोडणार्‍या गुरेमालकांना प्रतिदिनी प्रतिगुरामागे 1 हजार रुपयांची दंडात्मक करण्यात येईल. तसेच पकडण्यात आलेली गुरे दहा दिवसांत न नेल्यास त्या गुरांची लिलाव प्रक्रिया करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने सभागृहात घेण्यात आला.

बाजारपेठेतील गटाराचे बांधकाम करीत असताना ज्या नळग्राहकाचे नळकनेक्शन तोडण्यात आले, त्या नळग्राहकाला गेले दीड महिने पाणीपुरवठा झालेला नाही. ते नळकनेक्शन तत्काळ जोडून देण्यात यावे, अशी सूचना नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी केली. तसेच सफाई कर्मचार्‍यांना नवीन शासन निर्णयाप्रमाणे वेतन देण्याबाबत अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावी, अशी सूचना सौ. चांदोस्कर यांनी केली. दोन महिने उलटले तरी जामसंडे -पाटकरवाडी येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वीज पुरवठा सुरू झालेला नसल्याबाबत सभापती रूचाली पाटकर यांनी न. पं. प्रशासनाचे लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT