शिरगाव : देवगड तालुक्यातील साळशी देवणेवाडी येथे सापडलेले रहस्यमय विवर हे ‘सिंक होल’ असून ते निसर्गनिर्मित आहे. कोकणातील कातळ सड्यावर अशा प्रकारची अनेक सिंक होल आढळून येतात. यापैकी काही शोधली गेलेली आहेत. तर काहींचा शोध अजूनही लागायचा आहे. पावसाच्या पाण्यामध्ये कार्बन डाय ऑक्साईड विरघळल्यामुळे पाण्याचा सामू म्हणजे पी एच हा कमी होतो. त्यामुळे आम्लधर्मी पाऊस या खडकांवर पडल्यामुळे यात असलेले क्षार पाण्यात हळूहळू विरघळतात व त्यामुळे खडक ठिसूळ होतो आणि मग तो खडक कोसळून त्याची माती खाली पडते. त्यातून अशा प्रकारे ‘सिंक होल’ ची निर्मिती होते, असे मत भूगर्भ संदर्भातील माहिती देणारे कणकवली विद्यामंदिरचे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांनी साळशी येथे व्यक्त केले.
देवगड तालुक्यातील साळशी येथील गणपत उर्फ बाळा नाईक यांना देवणेवाडी येथील ‘पेरवणीचे माळ’ येथे आंबा, काजू बागेमध्ये साफसफाई करताना काही दिवसापूर्वी एक मोठे विवर सापडले. माळरानावर सापडलेल्या या विवराचे तोंड खूपच अरुंद असून आत डोकावल्यास सुमारे आठ फूट खोलीचे आणि सात फूट गोलाई व्यासाचे विवर आहे.याबाबत भूगर्भसंदर्भात माहिती देणारे कणकवली विद्यामंदिरचे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांना येथे बोलवण्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली.
या विवरामध्ये चाफेड ग्रा. पं. सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर, विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे, इतिहास प्रेमी अमोल शेळके यांनी प्रत्यक्ष आत विवरामध्ये उतरून माहिती घेतली असता हे विवर सुमारे 7 फूट व्यासाचे गोलाई आकाराचे असून आत 7 ते 8 माणसं बसू शकतात एवढी प्रशस्त जागा आहे. वरून पाहता निमुळत्या आकाराचे असले तरी हे विवर पूर्णतः गोलाई आकारात 7 फूट व्यासाचे आहे. आतील माती मध्ये खूप ओलावा आहे. या मातीमध्ये लहान बेडकींचा वावर आहे. त्यामुळे नक्कीच या विवराच्या आत पाण्याचा मुबलक साठा असू शकतो. मात्र याचे उत्खनन होणे आवश्यक आहे. सध्या या विवराची खोली सुमारे 7 फुटापर्यंत असून या विवराचे उत्खनन झाल्यास आतील साचलेल्या मातीचा ढिगारा बाहेर काढल्यास या विवराची खोलाई 15 ते 20 फुटापर्यंत होऊ शकते. पर्यायाने अनेक गोष्टींचा रहस्यमय गोष्टीचा उलगडा होऊ शकतो.
जमीन मालक गणपत उर्फ बाळा नाईक, मावळे आम्ही स्वराज्याचे या संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर, पोलिसपाटील सौ. कामिनी नाईक, माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, ग्रा.पं. सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर, महेश परब, निलेश नाईक, उमेश नाईक, केशव लब्दे, मनोज नाईक, संदीप वरेकर, प्रदीप नाईक, उदय सावंत, गणेश नाईक आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, कोकणात जांभा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो. त्यापासून लाल मातीची निर्मिती होते. या लाल मातीत आयर्न ऑक्साईड आणि अॅल्युमिनियम ऑक्साईड आढळते. अशा या जांभ्या दगडाला शास्त्रीय भाषेत ‘लेटराईज’ म्हटले जाते. सदरचे विवर हे निसर्गनिर्मित असून आत नक्कीच पाण्याचा साठा असू शकतो. त्यामुळे या विवराचे उत्खनन झाल्यास अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो.