देवगड : देवगड - जामसंडे नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आरखड्याबाबत नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. हा आराखडा नागरिकांना विश्वासात न घेता सेटिंग करून तयार केल्याचा गंभीर आरोप करीत हा आराखडा आम्हाला मान्य नाही, तो रद्दच करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
आराखडा रद्द केल्याचे लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. मात्र हा विषय नगरपंचायतीचा नसून नगररचनाकार विभागाचा आहे. यासाठी नगररचना विभाग अधिकारी व ग्रामस्थांची शुक्रवारी दुपारी 3 वा. बैठक घेण्यात येणार असल्याचे न. पं. प्रशासनाकडून सांगण्यात आले.
देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नगरपंचायत कार्यालयात प्रारूप विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी व आराखड्याला विरोध दर्शविण्यासाठी बुधवारी सकाळी 11 वा. देवगड- जामसंडे ग्रामस्थांनी नगरपंचायत कार्यालयावर धडक दिली. मात्र तेथे आराखड्याबाबत माहिती देण्यासाठी नगररचनाकार विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते.
उपस्थित न.पं.कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे व नगर अभियंता विवेक खोत यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. देवगड -जामसंडेमधील नागरिकांना विश्वासात न घेता बनवलेला हा पूर्वनियोजित आराखडा आहे,असा गंभीर आरोप प्रसाद मोंडकर यांनी केला. हा आराखडा नागरिकांना मान्य नाही. तो पूर्णपणे रद्द करा, अशी मागणी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम व विलास रूमडे यांनी केली.
नवीन आराखडा तयार करण्यापूर्वी ग्रामस्थांची बैठक घ्या, त्या बैठकीत चर्चा करून नागरिकांच्या सुचनेनूसार व मागणीनुसार नवीन आराखडा बनवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आराखड्यात जमीनी बाधित होणार्या जमीनदारांनाही बोलावून चर्चा करणे आवश्यक होते. नागरिकांना विश्वासात न घेता हा आराखडा तयार करण्यात आला. लोकांची घरे हटवून तुम्हाला विकास करायचा आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी केला.
यावेळी झालेल्या चर्चेत संजय बांदेकर, राजेंद्र पाटील, सुरेश सोनटक्के, स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे, शैलेश महाडिक, प्रसाद पारकर, शिवाजी कांदळगावकर, सौ. हर्षा ठाकूर, शरद लाड आदी ग्रामस्थांनी सहभाग घेवून प्रशासनांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आराखडा रद्द करण्यात येत आहे, असे लेखी पत्र द्या, तोपर्यत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
यावेळी उपस्थित अधिकार्यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधून दिला. मुख्याधिकार्यांनी हा विषय नगरपंचायतीचा नसून नगररचनाकार विभाग याबाबत निर्णय घेवू शकते, असे सांगीतले.
यावेळी नगररचनाकार विभागाशी संपर्क साधून दोन दिवसात ग्रामस्थांसमवेत बैठक आयोजित करावी अशी मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे केली. यानंतर नगररचनाकार विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वा. इंद्रप्रस्थ हॉल येथे बैठक आयोजित करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. या सभेला नगररचनाकार, नगरपंचायत तसेच भूमी अभिलेख विभागाच्या अधिकार्यांनाही बोलविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, उपाध्यक्ष प्रदीप सावंत, खजिनदार सुधीर मांजरेकर, विलास रूमडे, प्रसाद मोंडकर, विजय जगताप, संजय बांदेकर, उमेश कुळकर्णी, राजेंद्र पाटील, नगरसेवक बुवा तारी, शरद ठुकरूल, तेजस मामघाडी, सौ.प्रणाली माने, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, दयानंद पाटील, शिवाजी कांदळगावकर, सौ.हर्षा ठाकूर, रिमा आचरेकर, प्रफूल्ल कणेरकर, नीरज घाडी, विजय कदम आदी देवगड जामसंडेमधील बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.