देवगड : मृत्यूच्या दारात माणसाला आपल्या माणसांची साथ लाभावी, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र, एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांनीच पाठ फिरवल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. देवगड पोलिसांना चांदोशी येथे आढळलेल्या मृत व्यक्तीची ओळख पटवून नातेवाईकांना त्याची माहिती देण्यात आली. मात्र, अंत्यसंस्कारासाठी कोणीही उपस्थित न राहिल्याने अखेर देवगड पोलिसांनीच पुढाकार घेत त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले.
तळवडे बौद्धवाडी येथील सतीश रमेश जाधव (३८) यांची चांदोशी येथे शेतजमीन आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांना आपल्या जमिनीनजीकच्या चिरेबंदी पत्राशेडमध्ये एक तरुण निपचित पडलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. त्यांनी घटनेची माहिती तेथील पोलीस पाटील यांना दिली. सदरची माहिती देवगड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात त्या तरुणाला पोलीस पाटील व सतीश जाधव यांच्या मदतीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, सदर तरुणाची ओळख पटविण्यासाठी सोशल मीडियाद्वारे राबविण्यात आलेल्या मोहिमेत सदर मृत तरुणाचे नाव दीपक परब असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. ओळख निश्चित झाल्यानंतर नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले. मात्र, अंत्यविधीसाठी कोणीही न आल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली.
अशा परिस्थितीत पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांनी देवगड स्मशानभूमीत मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत, पोलीस हवालदार गणपती गावडे, आशिष कदम, कॉन्स्टेबल संतोष नाटेकर, विश्वास पाटील यांनी हे सामाजिक कर्तव्य पार पाडले. या घटनेतून रक्ताच्या नात्यांपेक्षाही माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याची जाणीव होते. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन पोलिसांनी दाखविलेली ही संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी आहे.