देवगड: देवगड जुनी बाजारपेठ येथील रोहिदास उपरकर यांच्या मालकीच्या मोडकळीस आलेल्या घरात पुरुष जातीचा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपरकर यांच्या मोडकळीस आलेल्या घरातून उग्र वास येत असल्याची माहिती गुरुवारी सकाळी देवगड पोलीस स्थानकाला मिळाली. देवगडचे पोलीस निरीक्षक श्याम बुवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत, हवालदार आशिष कदम, कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर, प्रतिक जाधव, होमगार्ड संतोष घाडी, श्री. कांदळगावकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. सदर मयत व्यक्ती अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयोगटातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनेची फिर्याद पोलीस पाटील आंचल कांदळगावकर यांनी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.