देवगड : तालुक्यातील मुणगे गावात केंद्र सरकारकडून प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता भगवती मंदिर, मुणगे येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच (प्रशासक) अंजली अशोक सावंत होत्या. सभेचे सूत्रसंचालन योगेश प्रकाश सावंत यांनी केले.
या ग्रामसभेला मिठबाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य भाई पारकर, मुणगे पंचायत समिती गण सदस्य सदाशिव ओगले यांच्यासह सुमारे २०० ते २५० ग्रामस्थ उपस्थित होते. सभेत उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या प्रभागातील ग्रामपंचायतींकडून प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविणारे ठराव मंजूर करून त्यांची प्रत मुणगे ग्रामपंचायतीला देण्याची विनंती लोकप्रतिनिधींना केली. तसेच मुणगे-आडबंदर परिसरात जमीन खरेदीसाठी कोणतीही बाहेरील व्यक्ती किंवा कंपनीचे प्रतिनिधी आल्यास त्यांना स्थानिक स्तरावर विरोध करून याची माहिती तत्काळ ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय, लवकरात लवकर कृती समिती स्थापन करून प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना देण्याचे ठरविण्यात आले. ग्रामसभेचा अधिकृत ठराव दोन दिवसांत तयार करून संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
भविष्यात प्रकल्पाविरोधात कायदेशीर लढा उभारण्याची वेळ आल्यास मुंबईस्थित ग्रामस्थ आणि गावातील नागरिकांनी आर्थिक सहकार्य करावे, असेही सभेत ठरविण्यात आले. यासाठी मुंबईतील ग्रामस्थांनी आतापर्यंत काही प्रमाणात आर्थिक निधी संकलित केल्याची माहिती सभेसमोर देण्यात आली. दरम्यान, या विशेष ग्रामसभेत अणुऊर्जा प्रकल्पाच्या विषयासोबतच गावातील विविध सार्वजनिक समस्यांवरही चर्चा करण्यात आली.