देवगड : मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांपैकी एक जण समुद्राच्या पाण्यात बुडाला असून, तिघांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. चैतन्य राजेंद्र गुरव (वय २२, मूळ रा. दादर-नायगाव, मुंबई) असे बुडालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. या दुर्घटनेत सोहम जयेश मंडोद (वय २०, मूळ रा. दादर-नायगाव) याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा देवगड ब्राह्मणदेववाडी येथील रहिवासी असलेला यश राजेंद्र उपरकर (वय २१) हा सध्या दादर-नायगाव येथे राहतो. मुंबईतील त्याचे मित्र ओम दीपक चव्हाण (वय १७), चैतन्य राजेंद्र गुरव, सोहम जयेश मंडोद आणि अर्णव राजेश तारी (वय २०) यांच्यासोबत तो सुट्टी घालवण्यासाठी देवगड येथे आपल्या गावी आला होता.
रविवारी सायंकाळी हे पाचही जण मिठमुंबरी बागवाडी येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. यश उपरकर हा किनाऱ्यावरच थांबला, तर उर्वरित चौघे जण पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने हे चारही जण बुडू लागले.
युवकांनी मदतीसाठी टाहो फोडल्यानंतर स्थानिक मच्छिमार रमेश मनोहर तारी, लक्ष्मण मनोहर तारी, मनीष रमेश तारी, बाबूराव धुरी आणि बाळा राजम यांनी तात्काळ धाव घेतली. बाबूराव धुरी व बाळा राजम यांनी स्वतःच्या नौकेसह समुद्रात धाव घेत बुडणाऱ्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या धाडसी स्थानिकांनी ओम चव्हाण, सोहम मंडोद आणि अर्णव तारी यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढून किनाऱ्यावर आणले.
यातील सोहम मंडोद हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला किनाऱ्यावर कृत्रिम श्वासोच्छवास देऊन शुद्धीवर आणण्यात आले. परंतु, यादरम्यान चैतन्य गुरव हा पाण्यात दिसेनासा झाला होता. स्थानिक मच्छिमारांनी नौकांच्या साहाय्याने सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडू शकला नाही.
प्रकृती चिंताजनक असलेल्या सोहम मंडोद याला तात्काळ खाजगी वाहनाने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
"पोहण्याचा हट्ट जीवाशी आला..."
"सुट्टी एन्जॉय करण्यासाठी माझे मुंबईतील मित्र गावी आले होते. पोहण्यासाठी आम्ही मिठमुंबरी बागवाडी किनाऱ्यावर गेलो असता, मी माझ्या मित्रांना समुद्रात न उतरण्याचा वारंवार सल्ला देत होतो. मात्र, त्यांनी ऐकले नाही आणि ही दुर्दैवी घटना घडली," अशी माहिती यश उपरकर याने दिली. दरम्यान, बुडालेल्या चैतन्य गुरव याला चांगले पोहता येत होते, तरीही तो पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर; 'बघ्यांची' भूमिका ठरली वेदनादायी
सध्या पर्यटन हंगाम असल्याने देवगड तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मिठमुंबरी बागवाडी किनाऱ्यावरही रविवारी पर्यटकांची गर्दी होती. धक्कादायक बाब म्हणजे, बुडणारे युवक जेव्हा मदतीची याचना करत होते, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अनेक पर्यटकांनी केवळ 'बघ्याची' भूमिका घेतली. स्थानिक मच्छिमारांनी देवदूतासारखे धावून येत जीवाची बाजी लावली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता. या गर्दीच्या किनाऱ्यावर एकही सुरक्षारक्षक तैनात नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.