Devgad Fraud Case
देवगड : दर महिना उत्तम परतावा देणारी स्किम असल्याचे आमिष दाखवून देवगड-जामसंडे शहरातील पाच महिलांची 12 लाख 72हजार 400 रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देवगड पवनचक्की येथील श्रध्दा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल धुरी (वय 36) या संशयित महिलेविरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार 22 सप्टेंबर 2023 ते 5 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडला. संशयित महिलेला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संशयित श्रध्दा मोंडकर हिने वरील कालावधीत देवगड- जामसंडे शहरातील पाच महिलांची सुमारे 12 लाख 72हजार 400 रूपयांची आर्थिक फसवणुक केली असून याबाबत देवगड पोलिस स्थानकात प्रशांत राऊत यांनी तक्रार दिली.या तक्रारीमध्ये मोंडकर हिने वरील कालावधीत पाच महिलांकडून उत्तम परतावा देणारी स्कीम असल्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंगकरीता रक्कम घेतली.
दरम्यान पाचही महिलांनी तिच्याकडे रकमेची मागणी केली असता तिने वेगवेगळ्या सबबी सांगून रक्कम देण्याचे टाळले. तसेच मुळ मुद्दलही ी परत न करता आर्थिक फसवणुक केली असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी श्रध्दा प्रकाश मोंडकर हिच्याविरूध्द भादवि कलम 409, 406,420 व महाठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम 1999 कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संशयित महिलेला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव करीत आहेत.