Devgad Alphonso : देवगडच्या गिर्ये रामेश्वरमधून कोकणातील पहिली हापूस आंब्याची पेटी वाशीस रवाना! 
सिंधुदुर्ग

Devgad Alphonso : देवगडच्या गिर्ये रामेश्वरमधून कोकणातील पहिली हापूस आंब्याची पेटी वाशीस रवाना!

प्रगतशील बागायतदार मिलेश बांदकर यांचा हंगामापूर्वी आंबा उत्पादनाचा प्रयोग; दिवाळी पाडव्याला आणखी सहा ते सात पेट्या काढणार

पुढारी वृत्तसेवा

देवगड : कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याचा हंगाम सुरू होण्यास काही महिने बाकी असतानाच देवगड तालुक्यातील गिर्ये रामेश्वर येथील प्रगतशील आंबा बागायतदार निलेश वसंत बांदकर यांनी आपल्या बागेतील आंब्यांची पहिली पेटी वाशी मार्केटकडे रवाना केली आहे. गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी संकष्टीच्या मुहूर्तावर त्यांनी साडेसहा डझन आंब्यांची पेटी काढली असून, शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी जनार्दन अँड कंपनी या दलालामार्फत तिची विक्री होणार आहे. दोन वर्षांपूर्वीही नोव्हेंबर महिन्यात वाशी मार्केटला आंब्याची पेटी पाठविण्याचा मान बांदकर यांनी मिळविला होता.

देवगडचा हापूस आंबा चव, सुगंध आणि दर्जासाठी प्रसिद्ध आहे. हंगामापूर्वीच आंबा बाजारात पाठविण्याच्या बांदकर यांच्या प्रयोगामुळे विजयदुर्ग विभागातील आंबा बागायतदारांचे लक्ष वेधले गेले आहे.

जूनमधील मोहोरापासून आंबा उत्पादन

बांदकर यांच्या बागेतील काही कलमांना जून महिन्यातच मोहोर आला होता. या मोहोराचे संगोपन करून फळधारणा व्हावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मोहोर आलेल्या चार ते पाच कलमांना प्लास्टिक कागदाचे आवरण घालून संरक्षण केले. तसेच वेळोवेळी फवारण्या करून मोहोर आणि फळांची निगा राखली. या प्रयत्नांना यश मिळाल्याने ऑक्टोबर महिन्यातच आंब्याची पहिली पेटी काढणे शक्य झाले.

दिवाळी पाडव्याला आणखी पेट्या

पहिल्या पेटीनंतरही हा प्रयोग सुरू ठेवण्याचा बांदकर यांचा मानस आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आणखी पाच डझन क्षमतेच्या सहा ते सात पेट्या काढण्यात येणार असल्याचे मिलेश बांदकर यांनी सांगितले. वाशी मार्केटमध्ये पहिल्या पेटीला किती दर मिळतो, याबाबत आंबा उत्पादकांमध्ये उत्सुकता आहे.

बांदकर बंधूंचे एकत्रित प्रयत्न

मिलेश बांदकर हे विजयदुर्ग विभागातील प्रगतशील आंबा बागायतदार असून, त्यांचे बंधू विद्याधर बांदकर यांच्यासोबत ते आंबा व्यवसाय करतात. बागेचे व्यवस्थापन आणि उत्पादनाचे नियोजन करताना त्यांना वडिलांची व भावाची मोलाची साथ मिळते. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच आंबा उत्पादनात नवनवीन प्रयोग करून यश मिळविता येत असल्याचे निलेश बांदकर यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात आंब्याची पेटी वाशी मार्केटला पाठविल्यानंतर यंदा ऑक्टोबरमध्येच पहिली पेटी रवाना करून बांदकर यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रयोगशीलतेची प्रचिती दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे देवगडच्या हापूस आंब्याची हंगामापूर्वीच बाजारपेठेत चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT