रोजगार, पर्यावरणपूरक विकास आदी मागण्यांसाठी युवकांनी रॅली काढली.  
सिंधुदुर्ग

Devgad News | ‘आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा’, रोजगारप्रश्नी युवक उतरले रस्त्‍यावर, भर पावसात बाईक रॅली!

पावसाची पर्वा न करता युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत मांडली भूमिका

पुढारी वृत्तसेवा

देवगड : स्थानिक युवकांना आपल्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळावी आणि देवगडचा सर्वांगीण विकास व्हावा, या मागण्यांसाठी रविवारी मुसळधार पावसातही शेकडो युवकांनी देवगडमध्ये भव्य मोटारसायकल रॅली काढली. भर पावसाची पर्वा न करता युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत विकासाच्या बाजूने आपली ठाम भूमिका मांडली.

जामसंडे येथील दिबदिवी मंदिर परिसरातून सुरू झालेली ही रॅली शुक्रवार बाजारपेठ मार्गे देवगड शहरात पोहोचली. "आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा", "रोजगारासाठी स्थलांतर नको", "पर्यावरणपूरक विकास झाला पाहिजे" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. अनेक युवकांनी घोषणाफलक हातात घेतले होते, तर काहींनी रोजगाराच्या मागणीचे संदेश असलेले रेनकोट परिधान करून आपली भूमिका प्रभावीपणे मांडली.

या रॅलीत ललित चांदोसकर, सिद्धेश माणगावकर, आर्यन माने, दीपक जानकर, ओंकार सारंग, निशांत शिंदे, हर्ष शेटये, ओंकार तावडे, शैल पांचाळ, आशिष जाधव, उदय पालेकर, राजन घाडी, मकरंद सावंत, उमर सोलकर, कृष्णा कोंडकर, श्रीकांत चव्हाण, विराज तेली, सत्येन जामसांडेकर यांच्यासह शेकडो युवक सहभागी झाले होते.

भरधाव पावसातही युवकांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही. शिस्तबद्ध रॅली आणि जोरदार घोषणांमुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. पर्यावरणाचा समतोल राखणारे विकास प्रकल्प उभे राहत स्थानिक युवकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळावा, अशी अपेक्षा सहभागी युवकांनी व्यक्त केली.

या रॅलीतून देवगडच्या युवा पिढीने विकास आणि रोजगार यांची सांगड घालणाऱ्या प्रकल्पांना पाठिंबा दर्शवत, "रोजगारासाठी गाव सोडण्याची वेळ येऊ नये; विकास आणि रोजगार दोन्ही देवगडमध्येच मिळावेत," असा स्पष्ट संदेश दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT