सावंतवाडी ः जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी शहरात हिंदू संघटनांनी लावलेला पाकिस्तानी ध्वज एका व्यक्तीने लपवून ठेवल्याच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात डीवायएसपी विनोद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत ध्वज लपवून दहशतवाद्यांचे समर्थन करणार्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीत प्रभारी पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, नगरपरिषद मुख्याधिकारी अश्विनी पाटील, उपनिरीक्षक संजय कातीवले यांच्यासह शांतता समितीचे सदस्य सिताराम गावडे, अॅड.नकुल पार्सेकर, अभिमन्यू लोंढे, विनायक रांगणेकर, हिदायतुल्ला खान, गोविंद गवंडे, तौकिर शेख, शब्बीर लांबे, चिन्मय रानडे, दिनेश गावडे, सुनील सावंत, गौरव शंकरदास, रोहन धुरी, उमेश सावंत, हरिचंद्र पवार आदी उपस्थित होते.
डीवायएसपी विनोद कांबळे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी शहरातील फळ विक्रेते आणि रस्त्यावर बसणार्या इतर विक्रेत्यांबाबत आढावा घेऊन योग्य व्यवस्थापन केले जाईल, तसेच गरज पडल्यास बैठक आयोजित केली जाईल असे सांगितले.
शांतता समिती सदस्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तसेच, हिंदू संघटनांनी निषेधार्थ लावलेला पाकिस्तानी ध्वज एका मुस्लिम व्यक्तीने काढून लपवून ठेवण्यामागील त्याचा नेमका हेतू काय होता, याची सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. या कृत्यामुळे शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
यासोबतच, शहरातील फळ विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न आणि अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी यावरही सदस्यांनी चिंता व्यक्त केली. नगरपरिषदेने याची दखल घेऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.
नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा मंडईचे बांधकाम सुरू असल्याने विक्रेत्यांना तात्पुरत्या जागेची अडचण येत आहे. लवकरच याचा आढावा घेऊन विक्रेत्यांना व्यवस्थित जागा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी सर्वांनी सहकार्य करावेे.अश्विनी पाटील, मुख्याधिकारी - सावंतवाडी न. प.