देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वावर हजारो दिव्यांच्या प्रकाशात सागरकिनारा उजळून निघणार आहे. समुद्राच्या लाटांचा नाद, मंदिर परिसरातील दीपमाळांची रोषणाई आणि असंख्य पणत्यांच्या प्रकाशाने कुणकेश्वरचा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी सायं. ६ वाजल्यापासून या भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दीपोत्सवात पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा, रंगावली कला प्रदर्शन, सुगम संगीत, पालखी प्रदक्षिणा आणि दीपप्रज्वलन अशा विविध कार्यक्रमांची पर्वणी भाविकांना अनुभवता येणार आहे.
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा २०२६. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आकाशकंदील बांबू, कागद, कापड, सुतळी किंवा टिकाऊ वस्तूंपासून तयार केलेला असणे बंधनकारक आहे. प्लास्टिक, थर्माकोल किंवा रेडिमेड चायनीज साहित्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. आकाशकंदील घरगुती व स्वतः तयार केलेला असावा, तसेच त्याची उंची किमान दोन फूट असणे आवश्यक आहे. सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ३ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला १ हजार ५०० रुपये, तर चतुर्थ क्रमांकाला १ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर असून, तयार केलेले आकाशकंदील श्री कुणकेश्वर मंदिर येथे जमा करावयाचे आहेत.
भक्ती, कला, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणारा दीपोत्सव
दीपोत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात येणार असून, पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशात श्री कुणकेश्वर मंदिराचे विलोभनीय रूप अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर हजारो दिव्यांची आरास साकारली जाणार असल्याने दीपावली पाडव्याच्या रात्री कुणकेश्वरचा सागरकिनारा प्रकाशाने उजळून निघणार आहे. भक्ती, कला, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणारा हा दीपोत्सव यंदाही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.