सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांकडून कवडी मोल किंमतीने जमिनी विकत घ्यायच्या आणि आपण कोट्यवधी रुपये कमवायचे, अश्यांचे धंदे मी बंद करणार आहे. या प्रवृत्ती विरोधात आता संघर्ष अटळ आहे, असा इशारा देत दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील भू माफियांची पोलखोल पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवत केली.
ज्या कंपन्यांनी दर ठरवून जमिनी घेतल्या तोच दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या अश्या व्यक्तीं विरोधात २० दिवसांपूर्वी तक्रारी केल्या आहेत, मात्र यावर अद्याप कारवाई झालेली नाही. मात्र आपण या भूमाफियांना पळता भुई थोडी करणार, असा सज्जड इशारा दीपक केसरकर यांनी दिला.
या पत्रकार परिषदेस शिंदे शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक अॅड. नीता सावंत-कविटकर, जिल्हा समन्वयक संजू परब, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, योगेश तेली उपस्थित होते दीपक केसरकर म्हणाले, सावंतवाडी हा शांतताप्रिय मतदारसंघ आहे, यापुढेही ही शांतता कायम राहिली पाहिजे, यासाठी माझे प्रयत्न आहेत.
मात्र या मतदारसंघात दोन अनिष्ट प्रवृत्ती वावरत आहेत, त्यांना या निवडणुकीत हद्दपार करावे, असे आवाहन मी जनतेला केले आहे. मी मतदारसंघाचा केलेला विकासात्मक कायापालट मतदारसंघात फिरल्यावरच दिसेल, जो मतदारसंघात कधी फिरत नाही, त्यांना विकास कसा दिसणार? असा सवाल करत केसरकर यांनी विरोधी उमेदवारांना टोला लगावला.
मी मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचवली, मला मराठी माणसांचा अभिमान आहे म्हणून हे केले, असा दावा केसरकर यांनी केला. मला यापुढे फक्त कोकणची जबाबदारी द्या, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. कारण कोकणासाठी आपल्याला भरीव काम करायचे आहे, असे ते म्हणाले, मंत्री पदाच्या काळात केलेल्याशैक्षणिक कामाचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. शिरोडा वेळागर येथील शेतकऱ्यांना 'ताज' ग्रुप मार्फत लवकरच ६० कोटी रू. वाटप होईल असे ते म्हणाले. नारायण राणेंचे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे ते म्हणाले.
मतदारसंघात जमिनीचे भाव गगनाला भिडले. काहीनी जमीन खरेदी-विक्रीत शेतकऱ्यांची. भूमिपुत्रांची फसवणूक केली आहे. यामुळे आपली शासकीय तपास यंत्रणांकडून चौकशी होईल, अशी त्यांना भीती आहे. म्हणूनंच त्यांना आमदार व्हावे अस वाटत आहे, अशी टीका त्यांनी नाव न घेता राजन तेली व विरोधी उमेदवारांवर केली. मात्र आपण त्यांना सोडणार नाही. शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांची वेळ पडल्यास 'ईडी' मार्फत चौकशी करू. पैशाने मत विकत घेता येत नाही, या भ्रमात कोणी राहू नये, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.