सावंतवाडी ः आजच्या काळात केवळ जनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढवणे आणि जिंकणे सोपे राहिलेले नाही. सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष उमेदवारांसाठी पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, लोकशाही प्रक्रियेत पैशांचा वारेमाप वापर होणे चिंतेची बाब असून यामागे नेमके कोण आहेत याची सखोल माहिती घेऊन वरिष्ठांचे लक्ष वेधणार आहेत. काही उमेदवारांचा थोडक्या मतांनी पराभव झाला असला तरी त्यांनी खचून न जाता संघटनेसाठी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.या सोहळ्यात न्हावेली गणाचे नवनिर्वाचित सदस्य शरद धाऊसकर यांच्यासह इतर विजयी उमेदवारांचा केसरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तातडीने कामाला लागावे, लोकांच्या अडचणी सोडवणे ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यश आनंददायी असल्याचे सांगत आगामी काळात संघटन मजबूत करण्यावर भर राहील, तसेच येत्या महिन्यात प्रत्येक गावात जाऊन युवा पिढीला संघटनेशी जोडण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास जिल्हाप्रमुख संजू परब, प्रेमानंद देसाई, गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.