आ. दीपक केसरकर (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Deepak Kesarkar| माझ्या कुटुंबातील कोणीही राजकारणात येणार नाही!

आ. दीपक केसरकर : कोकणातील चारा दुष्काळग्रस्त भागाला देणार

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : "पुढील काळात माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती राजकारणात येणार नाही आणि त्यांना राजकारणात रसदेखील नाही," अशी स्पष्टोक्ती आ. दीपक केसरकर यांनी दिेली आहे. गणेशोत्सवानिमित्त सावंतवाडी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना एका विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. आ. केसरकरांच्या या वक्तव्यानंतर सावंतवाडीसह संपूर्ण कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात होणारी मतदारसंघाची फेररचना लक्षात घेता, त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत.

आपल्या राजकीय प्रवासावर बोलताना आ. केसरकर म्हणाले, "आमदार झाल्यानंतर मी कोणतीही जमीन खरेदी-विक्री केलेली नाही. माझी पूर्वीची आणि तीन पिढ्यांची मालमत्ता समाजकारणासाठीच वापरली आहे. लोकप्रतिनिधी झाल्यानंतर माझी मालमत्ता वाढण्याऐवजी कमी झाली आहे. गेल्या चार टर्मपासून मी निरपेक्षपणे जनतेची सेवा करत असून, यापुढेही जनतेच्या उन्नतीसाठीच कार्यरत राहीन."

सावंतवाडीमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. पर्यटन, उद्योग आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक प्रकल्प मार्गी लागत असल्याचे सांगत ते म्हणाले, "आडाळी एमआयडीसीतील प्रकल्प, वाफोलीतील उद्योग, शिरोडा-वेळागर आणि आंबोलीतील पर्यटन व अ‍डव्हेंचर प्रकल्प, तिलारीतील पर्यटन विकास, तसेच सावंतवाडीतील बहुप्रतीक्षित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. याशिवाय दोडामार्ग, बांदा आणि शिरोडा येथील आरोग्य सुविधा, क्रीडांगणे, निवासी शाळा व एसटी बसस्थानक यांसारखी महत्त्वाची विकासकामे लवकरच पूर्णत्वाकडे नेली जातील."

राज्यावर दुष्काळाचे सावट 

राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत केसरकर यांनी सांगितले की, राज्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले आहे. तसेच, संकटकाळात कोकणातील अतिरिक्त चारा दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याला उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचेही आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT