कुडाळ तालुक्यात सर्वात जास्त तर
वैभववाडी तालुक्यात सर्वात कमी बालके
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केवळ 1480 गरोदर स्त्रिया
फक्त 1624 स्तनदा मातांची नोंद
गावातील शाळांमध्ये पटसंख्या वाढण्याची शक्यता कमी
जन्मदरामधील घट आणि स्थलांतर
गणेश जेठे
सिंधुदुर्ग : एक ते पाच पर्यंत पटसंख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळा बंदच कराव्या लागणार आहेत अशी स्थिती आहे. कारण अंगणवाड्यांमधील मुलांची संख्या वेगाने घटते आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमधील बालकांची संख्या 40 हजारावरून 23 हजारावर खाली आली असून ती निम्म्याने घटली आहे. गावाकडून होणारे शहरांकडील स्थलांतर आणि घटता जन्मदर ही दोन महत्वाची कारणे या परिस्थितीमागे आहेत. यामुळे अंगणवाड्यांची संख्याही कमी कमी होत चालली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पटसंख्या असलेल्या 36 शाळा आहेत. या शाळा लवकरच बंद कराव्या लागणार हे निश्चित आहे. असे असतानाच ज्या शाळांमध्ये पाच इतकी पटसंख्या आहे त्या शाळांचेही भवितव्य काही खरे नाही. किंबहुना 10 ते 15 इतकी पटसंख्या असलेल्या शाळा देखील पुढच्या काही वर्षात बंद कराव्या लागतील अशी सध्याची आकडेवारी सांगते आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून अनेक योजना ग्रामीण भागातील बालकांसाठी राबविल्या जात आहेत, असे असलेतरी गावातच कुणी रहायला तयार नसल्यामुळे या योजनांचे लाभार्थीही वर्षागणिक कमी होत आहेत.
बालकांच्या संख्येत 39960 वरून 23720 पर्यंत घट 2020-21 या वर्षात 0 ते 6 वयोगटातील 39960 बालके जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये नोंद करण्यात आली होती. यातील 0 ते 3 वयोगटातील बालके ही घरी असतात, परंतु त्यांना विविध योजनांतर्गत पोषण आहार व औषधोपचार पुरविले जात असल्यामुळे त्यांच्या नोंदी अंगणवाड्यांमध्ये असतात. 3 ते 6 वयोगटातील बालके अंगणवाड्यांमध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेत असतात. गेल्या पाच वर्षानंतर 2025-26 या वर्षाच्या जुलै महिन्यातील नोंदी लक्षात घेता ही बालकांची आकडेवारी निम्म्यावर आलेली आहे. म्हणजेच ती 23720 पर्यंत खाली आली आहे. 2021-22 मध्ये 37716, 2022-23 मध्ये 34242, 2023-24 मध्ये 27347, 2024-25 मध्ये 24931 आणि चालू वर्षात 23720 बालकांची नोंद झाली आहे. या आकडेवारीतून असे स्पष्ट होते की वर्षागणिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बालकांची संख्या घटत चालली आहे.
कुडाळ तालुक्यात सर्वात जास्त तर वैभववाडी तालुक्यात सर्वात कमी सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि देवगड या तीन तालुक्यांची लोकसंख्या जवळपास सारखी असली तरी कुडाळ तालुक्यात सर्वात जास्त बालके आहेत. चालू वर्षाची आकडेवारी विचारात घेतली तर कुडाळ तालुक्यात सर्वात जास्त 4965 इतकी बालके आहेत. त्यानंतर सावंतवाडी तालुक्यात 4608, कणकवली तालुक्यात 3652, देवगड तालुक्यात 3115, मालवण तालुक्यात 2532, त्यानंतर वेंगुर्ले तालुक्यात 2339, दोडामार्ग तालुक्यात 1508 आणि शेवटी सर्वात कमी वैभववाडी तालुक्यात 1001 इतकीच बालके आहेत.
पाच वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात 8158 त्या खालोखाल कणकवली तालुक्यात 7011 आणि सावंतवाडी तालुक्यात 6686 इतकी बालके होती. यावरून लक्षात येईल की या तीन तालुक्यातील बालकांची संख्या किती वेगाने घटत चालली आहे.
गेल्या पाच वर्षाची आकडेवारी पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरोदर स्त्रियांचे प्रमाणही निम्म्यावर आले आहे. 2021 मध्ये जिल्ह्यात 2690 गरोदर स्त्रिया नोंदल्या गेल्या होत्या, त्यानंतर पुढील वर्षी 2022 सालात त्यात घट होवून 2343 इतक्या गरोदर स्त्रिया नोंदल्या गेल्या. 2023 मध्ये 2295 आणि 2024 मध्ये 1628 इतकी नोंद झाली. 2025 च्या मार्च महिन्यात गरोदर स्त्रियांचा आकडा 1388 इतका नोंदला गेला आणि आता जुलैच्या 31 तारखेला 1480 इतकी नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षाची आकडेवारी पाहता हे प्रमाण घटत चालले आहे. अर्थात गरोदर स्त्रियांचेही सर्वात जास्त प्रमाण कुडाळ तालुक्यात असून सर्वात कमी प्रमाण दोडामार्ग तालुक्यात आहे.
2021 सालच्या मार्च महिन्यात 3059 इतक्या स्तनदा माता नोंदल्या गेल्या होत्या. 2022 सालात हा आकडा कमी होवून 2995 इतका झाला. त्यात पुन्हा घट झाली 2023 साली, ती झाली 2835 इतकी. 2051 स्तनदा माता 2024 सालात नोंदल्या गेल्या होत्या. 2025 सालात त्यात पुन्हा घट होवून हा आकडा 1763 वर खाली आला आणि आता जुलै महिन्याच्या 31 तारखेला 1624 इतक्या स्तनदा माता नोंदल्या गेल्या आहेत. मात्र इथे सर्वात जास्त स्तनदा मातांचे प्रमाण सावंतवाडी तालुक्यात 307 इतके असून सर्वात कमी वैभववाडी तालुक्यात 70 इतके नोंदले गेले आहे.
लोकांचा ओढा आता ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे वाढला आहे. छोट्या छोट्या पायवाटांवरून प्रवास करण्याऐवजी महामार्ग आणि मोठ्या रस्त्यांच्या लगत येवून घरे बांधून राहण्याकडे कल वाढला आहे. मुंबई, पुणे या शहरांबरोबरच कुडाळ, कणकवली, सावंतवाडी अशा शहरांकडे आणि तालुक्याच्या ठिकाणी आपला संसार थाटणार्यांची संख्या वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जन्मदर तसा प्रत्येक 1 हजार लोकसंख्येमागे 6 इतका आहे. हा जन्मदर महाराष्ट्रात सर्वात कमी आहे. त्यामुळे एकाच कुटुंबात एखाददुसरे मुल जन्माला येते आहे. गावांमध्ये लहान मुले आणि तरूणांपेक्षा सेवानिवृत्तीनंतर परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत बालकांची संख्या घटत चालली आहे.