कणकवली : राजू हरियाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध दशावतारी कलाकार होते. कला सादर केल्यानंतर घरी परतताच त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. राजू हरियाण यांनी घेतलेली अचानक एक्झिट कला क्षेत्राला चटका लावून जाणारी आहे. राजू हरियाण यांचा कलेचा वारसा यापुढेही सुरू ठेवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा भावना करूळ येथे शोकसभेमध्ये उपस्थितांनी व्यक्त केल्या.
अलिकडेच राजू हरियाण हे कणकवली तालुक्यातील शिरवल येथे दशावतारी नाटक सादर करण्यासाठी गेले होते. कला सादर करून ते कणकवली तालुक्यातीलच करुळ येथे आपल्या घरी परतल्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कला क्षेत्रात शोक पसरला होता. राजू हरियाण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी करुळ येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
या शोकसभेमध्ये करुळ गावच्या सरपंच समृद्धी नर, माजी सरपंच बबन कर्णिक, पत्रकार गणेश जेठे, केंद्रप्रमुख शिवाजी पवार, मुख्याध्यापक श्री. नारकर, सोसायटी चेअरमन वसंत तेंडुलकर, ओटव गावचे माजी सरपंच हेमंत परुळेकर, लोरे नं. 1 गावचे माजी सरपंच राजू राणे, दशावतारी कलाकार आप्पा दळवी, जितेंद्र दळवी, मंगेश कर्णिक, भाऊ कुडतरकर, तिवरे सरपंच भाई आंबेरकर, संजय सरवणकर, राजू ढवण, विकास गुरव, सुनील जाधव, संतोष कर्णिक, उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे यांनी व ग्रामस्थांनी व दशावतारी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त करत राजू हरियाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शोकसभेचे संचालन विद्याधर तांबे गुरुजी यांनी केले. जितेंद्र हरियाण यांनी सर्वांचे आभार मानले.
राजू हरियाण यांनी राज्य शासन, झी मराठी व इतर अनेक संस्थांचे पुरस्कार मिळविले होते. राजकारणात आणि समाजकारणातही ते सक्रिय होते. भजन क्षेत्रातही त्यांनी कला सादर केली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दशावतारी नाट्य प्रयोगांमध्ये ते सर्व प्रकारच्या भूमिका सादर करत. विशेषतः विनोदी भूमिका सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या जाण्यामुळे कणकवली तालुका व करूळ भागातील कला क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.