देवगड : देवगड तालुक्यातील पुरळ कोंडाबा पुजारेवाडी येथे एका सेवानिवृत्त शिक्षकाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ८ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. नागपंचमी सणासाठी कुटुंब बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना २८ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान घडली असून, याप्रकरणी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश आत्माराम जाधव (मूळ रा. शिवडाव) हे सेवानिवृत्त शिक्षक असून, पुरळ कोंडाबा पुजारेवाडी येथे पत्नीसह राहतात. २८ जुलै रोजी ते नागपंचमी सणानिमित्त पत्नीसह आपल्या मूळ गावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटे आणि इतर सामान अस्ताव्यस्त करून त्यांनी चोरी केली.
१ ऑगस्ट रोजी सुरेश जाधव यांची पत्नी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ सुरेश जाधव यांना माहिती दिली. घरात पाहणी केली असता कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड आणि पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सुमारे ७ लाख ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये मोठ्या मंगळसूत्रांसह, सोन्याच्या चैनी, बांगड्या आणि हारांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय कातिवले आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाच्या तपासासाठी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. सुरेश जाधव यांच्या फिर्यादीवरून विजयदुर्ग पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.