कणकवली ः दै.‘पुढारी’चे आणि आपले नाते फार जुने आहे. 86 वर्षांची देदीप्यमान वाटचाल करत ‘पुढारी’ने वाचकांच्या मनात अढळस्थान निर्माण केले आहे. निःपक्ष, निर्भीड आणि विश्वासार्हतेने दै.‘पुढारी’ने नेहमीच सकारात्मक पत्रकारिता जोपासली आहे. सिंधुदुर्गच्या विकासात दै.‘पुढारी’चे महत्त्वपूर्ण योगदान असून याही पुढे जिल्ह्याच्या विकासासाठी काय हवे? याचीही दिशा ‘पुढारी’ने आपल्या पत्रकारितेतून दाखवावी. माध्यमांनी प्रशासकीय धोरणांमधील त्रुटी दाखविताना समतोल पत्रकारिता जोपासावी, असे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दै.‘पुढारी’च्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना केले.
दै.‘पुढारी’चा 86 वा वर्धापनदिन सोहळा बुधवारी दै.‘पुढारी’च्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात पार पडला. जिल्हाधिकार्यांनी ‘पुढारी’चे संस्थापक संपादक डॉ. ग.गो. जाधव यांच्या प्रतिमेला पुष्हार अर्पण करून अभिवादन केले. कणकवलीचे प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, अमित सामंत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सावळाराम अणावकर, महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. संग्राम देसाई, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, डॉ. तुळशिराम रावराणे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव बाळ खडपकर, ‘पुढारी’चे आवृत्तीप्रमुख गणेश जेठे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले, आपल्या लहानपणी कोल्हापुरात पेपर म्हटला की पुढारी असेच समीकरण होते, कुणी स्टॉलवर गेला तर पुढारी द्या असेच म्हणायचा, मग त्याला कुठलाही पेपर हवा असू दे, एवढे पुढारीने जनमाणसाशी घट्ट नाते निर्माण केले होते, अर्थात ते आजही कायम आहे. दै.‘पुढारी’ने राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. सिंधुदुर्गातही पुढारीची घोडदौड यशस्वीपणे सुरू आहे. माध्यमांनी एखाद्या धोरणावर बातमी करताना दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत.विकासाची धोरणे ही राज्याचा विचार करून केली जातात, अशावेळी या धोरणात आपल्या जिल्हयासाठी काय हवे आहे याचाही विचार व्हायला हवा. पुढारीने आपली विश्वासार्हता नेहमीच जपली आहे, ती याही पुढे जपली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केला.
अॅड.संग्राम देसाई म्हणाले, दै. पुढारी व लायन्स क्लब यांचा माझ्या जीवनात मोठा वाटा आहे. दै. पुढारीच्या वर्धापन दिनाला आपण सातत्याने उपस्थित राहतो. त्यातूनच चांगली ऊर्जा मिळते,एक वृत्तपत्र किती चागलं काम करू शकतं हे दै. ‘पुढारी’ने दाखवून दिले आहे. कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी जो लढा सुरू आहे, त्यात दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांचे फार मोठे योगदान आणि सहकार्य आहे. महाराष्ट्राच्या जडघडणीत पुढारीचे मोठे योगदान राहिले आहे,असे त्यांनी सांगितले.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, शालेय जीवनात वर्तमानपत्र वाचण्याची सवय पुढारीमुळे लागली.पुढारीने आपले वेगळेपण नेहमीच जपले आहे. सिंधुदुर्गची पत्रकारिता सकारात्मक असून जिल्ह्याच्या विकासात दै. ‘पुढारी’चा मोठा वाटा आहे.
कार्यक्रमात महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. संग्राम देसाई यांचा तसेच जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचाही दै.‘पुढारी’च्या वतीने सत्कार करण्यात आला. आवृत्तीप्रमुख गणेश जेठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी दै.‘पुढारी’ परिवारातील सदस्य तसेच कणकवली तालुक्यातील पत्रकार, नागरिक, वाचक, वृत्तपत्र विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार अजित सावंत यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले, सामाजिक काम करण्याची प्रेरणा आपल्याला दै.‘पुढारी’तून मिळाली. जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आम्ही ज्यावेळी आवाज उठवितो त्यावेळी दै. ‘पुढारी’ची भक्कम साथ आम्हाला मिळते. पुढारीची सकारात्मक आणि विकासात्मक पत्रकारिता जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपुर्ण ठरल्याचे गौरवोद्गार त्यांनीकाढले.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, पुढारी परिवारासोबत आमचे जुने ऋणानुबंध आहेत. पुढारी हे जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक आहे. पुढारीमध्ये आम्ही दिलेली बातमी जशीच्या तशी प्रसिद्ध होत नाही तर त्यात सुधारणा होत असतात, त्यातून आमच्यातील चुका आम्हाला दिसून येतात, त्याचबरोबर समाजहितासाठीची पत्रकारिता दिसून येते असे सामंत म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर म्हणाले, दै. पुढारी मधून अनेक पत्रकार तयार झाले आहेत. सिंधुदुर्गच्या विकासात दै.पुढारीचे भरीव योगदान आहे. सावळाराम अणावकर म्हणाले, लोकशाहीत चौथा स्तंभ वृत्तपत्र व पत्रकारितेकडे पाहिले जाते. लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम वृत्तपत्रे करत असतात. इलेट्रॉनिक्स मीडियापेक्षा वृत्तपत्रे ही बातम्या अभ्यासपूर्ण मांडणी करतात. त्यातील बातम्या सत्यावर आधारित असतात. सत्य बाहेर काढणे, अन्याया विरुध्द लढणे हे जनसेवेचे व्रत आहे, ते वृत्तपत्रांनी कायम जोपासावे असे श्री. अणावकर म्हणाले.