रूपेश राऊळ pudhari photo
सिंधुदुर्ग

पीक विमा कंपन्यांकडून शेतकरी वेठीस

Crop insurance issues: ठाकरे शिवसेना उद्या तहसीलदार आणि कृषी अधिकार्‍यांचे लक्ष वेधणार

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी ः फळपीक विमा योजना राबविणार्‍या कंपन्या दरवर्षी बदलून सरकार शेतकर्‍यांना वेठीस धरत आहे, याबाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवार 22 एप्रिल रोजी स.11 वा. तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे, असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी सांगितले. तरी संबंधित शेतकरी व बागायतदारांनी सावंतवाडी तहसील कार्यालयात 22 रोेजी उपस्थित राहावे. असे आवाहन त्यांनी केले.

याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात श्री. राऊळ यांनी म्हटले आहे, राज्यात फळ पीक विमा योजना राबविली जाते. यासाठीच्या कंपन्या दरवर्षी बदलल्या जातात.या कंपन्या शेतकरी व बागायतदारांकडे पिक विमा उतरविण्यासाठी तगादा लावतात. मात्र नुकसानी झाल्यास परतावा देताना अनेक अटी व शर्थी लावल्या जातात. प्रत्येक विमा कंपनी नुकसान भरपाईसाठी आपल्या मर्जीनुसार नियम व निकष लावत असल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक या विमा कंपन्यांकडून होत असल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे.

राज्यातील द्राक्ष, आंबा, डाळिंब,आणि इतर फळपिकांसाठी शासनाकडून प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि राज्य पुरस्कृत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविल्या जातात. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. मात्र, अनेक शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, या योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित केले जाते.

रूपेश राऊळ यांनी सांगितले की , दरवर्षी विमा भरण्याची अंतिम तारीख जवळ आली की, कृषी विभागाचे कर्मचारी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आमच्याकडे येतात आणि नोंदणी करण्याचा आग्रह धरतात. आम्ही आधीच ई-पीक नोंदणी केली आहे, तरीही वारंवार तोच तगादा लावला जातो. तसेच हंगामाच्या शेवटी शेतकर्‍यांची फसवणूक होईल, अशा जाहिराती दिल्या जातात.

ई-पीक नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी

प्रत्येक वेळी नवीन विमा कंपनी येते आणि त्यांच्या वेगळ्या नियमांमुळे आम्हाचा गोंधळ होतो. ई-पीक नोंदणी प्रक्रिया किचकट आहे आणि त्यात अनेकदा अडचणी येतात. या सगळ्यामुळे आम्हाला शेतीत लक्ष देणे कठीण झाले आहे. शासनाने विमा योजनेची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावी, यात दुमत नाही. मात्र, वारंवार तगादा लावण्याऐवजी प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करावी. ई-पीक नोंदणीतील त्रुटी दूर कराव्यात आणि विमा कंपन्यांच्या नियमांमधील सुसूत्रता आणावी, जेणेकरून शेतकर्‍यांना वेळेवर आणि सहजपणे योजनेचा लाभ घेता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT