Crocodile Attack 
सिंधुदुर्ग

Crocodile Attack | कळणे नदीपात्रात मगरीचा गाईवर भीषण हल्ला; जिवाच्या आकांताने झुंज देत गाईने वाचवला जीव!

Crocodile Attack | कळणे नदीपात्रात मगरीची गाईवर झडप; गाईची जिवाच्या आकांताने मगरीशी झुंज; अखेर शेपटी तुटल्याने गाय बचावली; मगरींच्या वावरामुळे माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : ओम देसाई
कळणे येथे नदीकाठी पाणी पिण्यासाठी गेलेल्या गाईला पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक जबड्यात पकडले आणि नदीपात्रात ओढण्याचा प्रयत्न केला. मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी गाईने जिवाच्या आकांताने झुंज दिली. या झाटापटीत तिच्या शेपटीचा मोठा भाग मगरीच्या जबड्यातच तुटून राहिला आणि गाय रक्तबंबाळ अवस्थेत नदीपात्रातून बाहेर पडली. या थरारक घटनेत गाईचा जीव थोडक्यात वाचला असला तरी ती गंभीर जखमी झाली आहे.

कळणे येथे घडलेल्या या घटनेने परिसरातील ग्रामस्थ आणि पशुपालक हादरले असून नदीपात्रात मगरींचा वाढता वावर हा आता केवळ जनावरांसाठीच नव्हे, तर नदीकाठी जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी सुद्धा धोक्याचा इशारा ठरत आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जि. प. सदस्या सुजाता पडवळ यांचे पती अजित पडवळ यांची कळणे येथे शेती व बागायती आहे. त्यांच्या मालकीची गाय नेहमीप्रमाणे नदीकाठी पाणी पिण्यासाठी गेली होती. गाय नदीपात्रात पाणी पीत असतानाच पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक गाईवर झडप घातली. मगरीने गाईची शेपटी जबड्यात घट्ट पकडली आणि तिला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्याने गाय बिथरली, मात्र जीव वाचविण्यासाठी तिने पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार सुरू केला.

मृत्यूच्या जबड्यातून सुटका

गाय आणि मगरीमध्ये काही काळ झटापट सुरू होती. मगरीची पकड सुटत नसल्याने गाईची धडपड आणखी वाढली. अखेर या संघर्षात गाईची शेपटी मगरीच्या जबड्यातच तुटून राहिली. शेपटीचा मोठा भाग गमावूनही गाय नदीपात्रातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरली. जखमी अवस्थेत बाहेर आलेल्या गाईच्या शेपटीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. वेदनेने व्याकुळ झालेल्या या गाईची अवस्था पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तातडीने उपचार

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मोरगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश रेडकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेत जखमी गाईवर उपचार केले. उपचारांनंतर गाईची प्रकृति स्थिर असल्याची माहिती मिळाली.

आज गाय बचावली; उद्या माणसाचे काय?

या घटनेनंतर कळणे परिसरातील ग्रामस्थ आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठी शेतीची कामे करण्यासाठी जाणारे शेतकरी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी येणारे पशुपालक आणि नदीकाठच्या परिसरात वावरणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाईवरील हा हल्ला ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे.

नदीपात्रात मगरींचा वावर नेमका कुठे आहे? याचा वनविभागाने तातडीने शोध घेऊन ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नदीकाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या पशुपालकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT