दुकानवाड : स्मशानात एका बाजूला मालकाचा मृतदेह जळताय तर दुसर्या बाजूला मालकाचा लळा लागलेली गाय स्वतःची जीवनयात्रा संपवण्यासाठी विहिरीकडे वळते, असा भावस्पर्शी प्रसंग नुकताच कुडाळ तालुक्यातील वसोली गावात घडला. माणगाव - मार्गावरील हॉटेल व्यावसायिक विठोबा शेडगे यांचे वडील कृष्णा नारायण शेडगे यांचे नुकतेच वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. दरम्यान, एकीकडे त्यांच्या शवाला मुखाग्नी देणे सुरू असतानाच दुसरीकडे त्यांच्या गायीने लगतच्या विहीरीत उडी मारुनआपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने शेडगे उपस्थितीत अचंबित झाले तर शेडगे कुटुंबीयांना धक्का बसला.
कृष्णा शेडगे यांचे मुक्या प्राण्यावर जन्मजात जीवापाड प्रेम. त्यामुळे गाई पाळण्याचा त्यांना लहानपणापासूनच छंद. सन 2000 सालापर्यंत त्यांच्या वाड्यात तब्बल 50 गाईंचा कळप होता. वयोपरत्वे या गायींना संभाळणे कठीण होत असल्याने त्यांनी सर्व गाई सामान्य लोकांना दान केल्या, मात्र एकही गाय विकली नाही. तरीही केवळ वडिलोपार्जीत या पशुधनाची आठवण म्हणून त्यांनी ‘मोरी’ नामक गाईचे पालन पोषण तिच्या आयुष्याच्या अंतापर्यंत करायचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांची पत्नी रुक्मिणी हिचे 1993 साली निधन झाले. तेव्हापासून शेडगे यांनी चार मुलगे आणि दोन मुली यांचा सांभाळ आई आणि वडील अशा दुहेरी भूमिकेत केला. त्याच काळात घरात गाईच्या एका गोंडस वासराने प्रवेश केला. प्रेमाने तीच नाव ‘मोरी’ ठेवण्यात आले. मोरी गाईच्या जन्मापासून शेडगे यांच्या घरात पुन्हा लक्ष्मी नांदू लागली. नियतीने घरच्या लक्ष्मीला हिरावून नेले पण दुसर्या बाजूने मोरी गाईच्या रुपाने तिला पुन्हा पाठवले, अशी सर्वांची धारणा झाली. हळूहळू मोरी गाय कुटुंबाचा अविभाज्य घटक बनली. वैशिष्ट्य म्हणजे मालक कृष्णाने तिला मरेपर्यंत गळ्यात दोर बांधू दिला नाही. त्यामुळे तिची उठ बस घराच्या पडवीत, अंगणात, माजघरात, व्हरांड्यात कोठेही असायची. बराच वेळ बाहेर कोणी दिसले नाही तर ती थेट किचनमध्ये डोकावून पाहायची. कधी कधी ती घराच्या दारावरच भगवान शंकराच्या नंदीप्रमाणे ठाण मांडून बसायची. मात्र एखादी व्यक्ती आल्याची चाहूल लागताच मान बाजूला वळवून तिला मार्ग खुला करून द्यायची.
मालक, कृष्णा यांच ‘मोरी’ गाईवर आणि ‘मोरी’ चे मालकावर जीवापाड प्रेम. रात्री ते कितीही उशीरा घरी आले तरी ‘मोरी’ हिला हिरवा चारा आणि मगच आपण जेवत. लक्षात ठेवा, मुके प्राणी हे सारे लक्षात ठेवत असतात. बुधवार, 4 जून रोजी शेडगे यांचे माणगावमध्ये सकाळी आकस्मित निधन झाले. ही वार्ता वसोलीला कळताच त्यांच्या घराकडे माणसांची रीघ लागली. उदास वातावरण पाहून मोरी गाय अस्वस्थ व चलबीचल झाली. पण या प्रसंगात तिच्याकडे कोण पाहणार? थोड्याच वेळात शेडगे यांचा मृतदेह वसोलीत घरी आणण्यात आला. अंत्ययात्रेने प्रेत स्मशान भूमीकडे रवाना झाले. तिकडे शेडगे यांचे प्रेत चितेवर जळू लागले आणि त्याच वेळेला इकडे मोरी गाईने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. स्मशानभूमीतील सोपस्कार उरकून लोक वाडीत परतल्यानंतर मोरी गाईनेही आपले जीवन समर्पित केल्याचे लक्षात आले. कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या आठवणीचा एक धागा मोरी गायीच्या रुपाने शिल्लक होता तोही नियतीने हिरावून नेला.