Sindhudurga Fishermen Warning
मळगाव : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेले दोन दिवस संततदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खवळलेल्या समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये,असा इशारा मत्स्य विभागाने मच्छीमारांना दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात 1 ऑगस्ट पासून मच्छीमारांनी नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात केली होती. गेले दोन दिवस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वेंगुर्ले तालुक्यासह जिल्हाच्या किनारपट्टीवर पावसाची संततदार सुरू आहे. पाऊस सुरू असल्यामुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. पाऊस आणि वेगाच्या वार्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांच्या मच्छीमारी नौकांना धोका निर्माण होऊ शकतो. या कालावधीत मच्छीमाराने मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊन जीव धोक्यात घालू नये, असा इशारा मत्स्य विभागाने दिला आहे.
खवळलेला समुद्राच्या उंच उंच लाटा किनार्यावर येऊन धडकत असल्यामुळे किनार्यांची झीज झाली आहे. किनारी भागात राहणार्या मच्छीमार बांधवांनी मत्स्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारी नौका मच्छीमाराने सुरक्षित खाडीपात्रात आणल्या आहेत. आणखी पुढील दोन दिवस पावसाची स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सतर्कता बाळगली जात आहे.