सावंतवाडी : गेली अनेक वर्षे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे पक्षाची ताकद लक्षात घेता हा मतदारसंघ काँग्रेसलाच सोडण्यात यावा आणि ज्येष्ठ नेते विलास गावडे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. कोण पुड्या सोडतात आणि चुकीची माहिती पुरवितात याबाबत आपण काही बोलणार नाही, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. समीर वंजारी हे कॉंग्रेसमधून इच्छुक असल्याबाबत विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, विधाता सावंत, सिद्धेश परब, अॅड. राघवेंद्र नार्वेकर, रवींद्र म्हापसेकर, श्याम सावंत, प्रकाश डिचोलकर, बाबू गवस, शिवा गावडे, संजय लाड, सुमेधा सावंत, काका भुते, माया चिटणीस आदी उपस्थित होते.
श्री. सांगेलकर म्हणाले, या ठिकाणी विधानसभेसाठी विलास गावडे यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी १५ दिवसांपूर्वी आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीला त्यांच्याकडून निश्चित सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा आमचा विश्वास आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. अन्य कोणी दावा केला, कोण पुड्या सोडत आहे. यावर आपण काही बोलणार नाही. आमचे नेते आणि जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख जे सांगतील ते फायनल आहे. त्यांनी अद्यापपर्यंत विलास गावडे वगळता अन्य कोणाचे नाव पुढे केले नाही. सावंतवाडी मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून हा आम्ही दावा केला आहे. अजूनही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही त्यामुळे कॉंग्रेसला हा मतदारसंघ मिळावा, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.