मळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारपट्टी भागात अवकाळी पाऊस कोसळत असून वेगवान वारे वाहत आहेत, या प्रतिकूल परिस्थितीमुळे अरबी समुद्र खवळला असून किनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा आदळत आहेत. बंदर विभागानेही धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा वेंगुर्ले बंदरावर लावला आहे. या पार्श्वभूमीवर मासेमारी ठप्प झाली असून, मच्छीमारांनी सतर्कता बाळगत आपल्या मच्छीमारी नौका खाडी पात्रात नांगरून ठेवल्या आहेत.
वेंगुले तालुक्यात गेले काही दिवस अवकाळी पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नदी-नाल्यांना पाणी आले आहे. पावसाच्या पाण्याखाली भात शेती गेल्याने ती कुजण्याचा धोका आहे. तसेच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेंगुर्ले आगारातून सावंतवाडी व कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसेस पावसामुळे उशिराने धावत आहे. समुद्राच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. उंच उंच लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत. त्यामुळे किनारी भागाची झीज होत आहे. हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिल्याने मच्छीमारांनी मासेमारी बंद केली आहे.
जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून नवीन मच्छीमारी हंगाम सुरू झाला. मात्र तेव्हापासून समुद्रात प्रतिकूल परिस्थिती असल्याने अजूनही पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरू झालेली नाही. सध्या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशा परिस्थितीत समुद्रातील धोका टळला नसल्यामुळे बंदर विभागाने मच्छीमार व नागरिकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.
समुद्रातील प्रतिकूल वातावरण पाहून बंदर विभागाने धोक्याचा इशारा देणारा तांबड्या रंगाचा बावटा वेंगुर्ले बंदरवर लावला आहे. बंदर विभाग व मत्स्य विभागाकडून पुढील सूचना मिळत नाही तोपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी आपल्या नौका खाडीपात्रात नांगरून ठेवल्या आहेत.