कणकवली : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सिंधुदुर्गात 10 ठिकाणांवर झालेल्या स्वच्छता मोहिमेत 2,376 श्रीसदस्य सहभागी झाले होते. दिवसभरात सुमारे 81 टन कचर्याचे संकलन करून 39,500 चौ.मी. परिसर स्वच्छ करण्यात आला. त्याचबरोबर 10 कि.मी. दुतर्फा रस्ता व 2 कि.मी. समुद्र किनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे या प्रतिष्ठानचे कार्य सर्वत्र पोहोचले आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी-नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान यांचा समावेश असतो. याची दखल घेऊन तत्कालीन राज्यपालांनी डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केले.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेला देशव्यापी स्वच्छता अभियान कार्यक्रम रविवारी सकाळी 8.30 झाला. यअंतर्गत जिल्ह्यामधील चिवला समुद्रकिनारा, मालवण, कासार्डे येथील श्री महालक्ष्मी मंदिर व श्री विठ्ठलादेवी मंदिर परिसर, तळेरे बसस्थानक, पंचायत समिती वैभववाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडाघाट, एस.टी.स्टँड कणकवली, पिंगुळी तिठा रस्ता, निमूसगा ते लाईट हाऊस रस्ता वेगुर्ले, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, कुणकेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात सरकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. या कार्यामागे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.