कारिवडे येथे दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहीम  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : कारिवडे येथे दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहीम

लोकप्रतिनिधींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आपले शहर सुंदर आणि स्वच्छ राहावे यासाठी कारिवडे येथील सावंतवाडीच्या हद्दीवर आज दुसऱ्या दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सावंतवाडी कृती समितीचे सर्व सदस्य, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​स्वच्छता मोहिमेदरम्यान कारिवडे हद्दीवरील कचऱ्याचे विदारक दृश्य पाहून नगराध्यक्षांनी तीव्र खंत व्यक्त केली. "हे दृश्य फक्त लाजिरवाणं नाही, तर आपल्या सर्वांसाठी डोळे उघडणारे सत्य आहे," अशा भावना व्यक्त करत नगराध्यक्षांनी सावंतवाडीतील तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात आणि त्यानंतरही शहर स्वच्छ ठेवण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

​सवयी बदला, शहर आपोआप स्वच्छ होईल

नगरपालिका आणि स्वच्छता कर्मचारी रोज शहर स्वच्छ करू शकतात; परंतु जोपर्यंत नागरिक स्वतःच्या सवयी बदलत नाहीत, तोपर्यंत सावंतवाडी कायमस्वरूपी स्वच्छ होणार नाही.​ सावंतवाडीच्या मुख्य प्रवेशद्वारांवर किंवा शहरातील कोणत्याही सार्वजनिक व मोकळ्या जागेत कचरा टाकणे पूर्णपणे बंद करावे. घरातील कचरा नेहमी ओला आणि सुका असा वेगळा करूनच कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करावा.​ पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्लास्टिकचा वापर शक्य तितका टाळावा. नागरिक एका क्षणात रस्त्यावर कचरा टाकून निघून जातात, मात्र तो उचलण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना तासन्‌तास मेहनत करावी लागते. ते केवळ कचरा उचलत नाहीत, तर आपल्या वतीने शहराला स्वच्छ ठेवण्याची मोठी जबाबदारी पार पाडतात. या स्वच्छता मोहिमेस कृती समितीचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सावंतवाडी हा आपला अभिमान!

"सावंतवाडी ही केवळ एक नगरपालिका नसून ते आपले घर, आपली ओळख आणि आपला अभिमान आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही फक्त प्रशासनाची किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाच्या काळात आज आपण कचरा उचलला, उद्या पुन्हा उचलू; पण आता कचरा उचलण्यापेक्षा कचरा टाकणे थांबवण्याची वेळ आली आहे. स्वच्छता ही केवळ एक मोहीम न राहता ती आपली जीवनशैली बनवूया," असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT