कुडाळ : गणेशोत्सवासाठी गावी दाखल झालेले मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सव साजरा करून परतीच्या प्रवासाला लागले आहेत. अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केल्यानंतर चाकरमानी परत निघाल्याने कुडाळसह सिंधुदुर्गातील सर्वच रेल्वे स्थानकांवर गर्दी होत आहे.
मुंबईला जाणाऱ्या सर्वच नियमित व विशेष रेल्वे गाड्यांना चाकरमान्यांची गर्दी आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आले होते. दीड, पाच, सात, नऊ, अकरा दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासाला जायला निघतात. विशेष म्हणजे यावर्षी अनंत चतुर्दशी व गणपतीचा अकरावा दिवस एकाच दिवशी आल्याने गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांना सोयीस्कर झाले. अकरा दिवसांच्या विसर्जनानंतर जिल्ह्यातील प्रत्येक रेल्वे स्थानके चाकरमान्यांच्या गर्दीन गजबजली आहेत, काही चाकरमानी अनंत चतुर्दशी दिवशीच सायंकाळी अकरा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करून रात्रीच्या रेल्वे गाड्यांनी मुबंई जायला निघाले. बुधवारी व गुरूवारी दोन्ही दिवस कुडाळ रेल्वे स्थानकासह सर्वच स्थानकात मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दिवा, कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, जनशताब्दी सुपर एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा सुपर एक्सप्रेस आदी नियमित गाड्यांना मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची गर्दी होती. तसेच स्पेशल गाड्यांनाही चाकरमान्यांनी गर्दी केली होती. गणेशोत्सवापूर्वी माहिनाभर अगोदर चाकरमानी रेल्वे गाड्यांची तिकिटे बुकिंग करीत असतात. रेल्वे तिकिटे मिळाली नाही, तर लक्झरी बसची तिकिटे काढून किंवा स्पेशल गाडीने गावी येतात. तिकीटासाठी त्यांची मोठी दमछाक होते. रेल्वे, लक्झरी बसचे तिकीट मिळाले नाही तर त्यांना एसटी बसचा आधार घ्यावा लागतो. गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर पुन्हा चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. अकरा दिवसाच्या विसर्जनानंतर प्रत्येकजण आपल्या कामावर जायला निघतो. त्यामुळे गेले दोन दिवस चाकरमान्यांची परतीच्या प्रवासाची लगबग आहे.