‘बीएसएनएल‌’चे टॉवर विकायचे आहेत! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : ‘बीएसएनएल‌’चे टॉवर विकायचे आहेत!

माणगावात ठाकरे युवासेनेचा उपरोधिक बॅनर

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : माणगाव खोऱ्यात बीएसएनएलच्या ढिसाळ सेवेमुळे संतापलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने अनोखा उपरोध करत दूरसंचार विभागाचे लक्ष वेधले. ‌‘बीएसएनएलचे टॉवर विकायचे आहेत‌’ असा उपरोधिक बॅनर माणगाव येथील बीएसएनएल टॉवरखाली झळकवत युवासेनेने अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात मनाई आदेश असल्याने प्रत्यक्ष आंदोलन शक्य नव्हते; मात्र या उपरोधिक बॅनरमुळे तरी अधिकाऱ्यांची सद्विवेकबुद्धी जागी होते का? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केला.

गेल्या अनेक दिवसांपासून माणगाव खोऱ्यातील बीएसएनएल टॉवर आऊट ऑफ नेटवर्क असल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. हा दुर्गम परिसर असल्याने परिसरात अन्य खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा नाही. यामुळे अचानक आजारपण, अपघात किंवा तातडीच्या प्रसंगी संपर्क साधणे अशक्य बनले आहे. अनेकदा निवेदन देऊन, पाठपुरावा करूनही बीएसएनएल अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. श्री.धुरी म्हणाले, सततच्या रेंज समस्येमुळे आता माणगाव खोऱ्यातील बीएसएनएलचे सर्व टॉवर भंगारात विकायचे आहेत का? असेच चित्र निर्माण झाले आहे. माजी खा. विनायक राऊत व माजी आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून उभे राहिलेले हे टॉवर राजकीय घडामोडींनंतर रखडल्याचा आरोप त्यांनी केला. मनाई आदेशामुळे आंदोलनाचा मार्ग बंद असला तरी बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केलेला हा उपरोध तरी संबंधित अधिकाऱ्यांना हलवतो का, याकडे आता स्थानिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्यासह ठाकरे गटाचे विभागप्रमुख एकनाथ धुरी हे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT