मडुरा : न्हावेली गाव व परिसरात गेल्या एक महिन्यापासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी परिसरातील मोबाईल ग्राहकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. बीएसएनएलच्या अधिकार्यांनी याकडे तात्काळ लक्ष देत सेवा सुरळीत करण्याची मागणी न्हावेली ग्रामस्थांनी सावंतवाडीत बीएसएनएल अधिकार्यांची भेट घेऊन केली.
इंटरनेट आणि मोबाईल फोन हे आज जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. परंतु न्हावेलीमध्ये गेले आठ दिवसांपासून सतत खंडित होणार्या बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेमुळे वर्क फ्रॉम होम काम करणार्या नोकरदारांच्या कामात व्यत्यय येत आहे.
तसेच अत्यावश्यक वेळी फोन करणे सुद्धा कठीण होत आहे. सहाजिकच रिचार्जचा खर्च वाया जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीवेळी फोन करावयाचा झाल्यास आम्हाला घरापासून दूरवर जावे लागते. यासाठी गावातील दूरसंचार टॅावरची नेटवर्क क्षमता वाढविण्याची मागणी न्हावेली ग्रामस्थांनी केली आहे.
शिवसेना शिंदे गट उपविभागप्रमुख सागर धाऊसकर, माजी उपसरपंच विशाल गावडे, लक्ष्मण धाऊसकर, नीलेश परब, सागर नाईक, आयुष नाईक, रघुनाथ परब आदी उपस्थित होते.