कणकवली : मूळ उत्तर प्रदेशमधील व कामानिमित्त कणकवली-जानवली येथे राहणार्या चौघा तरुणांमध्ये हाणामारी झाली. यात एका तरुणावर ब्लेडने वार करण्यात आले. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री 9.30 वा. च्या सुमारास ही घटना घडली.
जानवली-वाकडवाडी येथे कल्लू रसपाल निसाद (26), प्रेमचंद निसाद (35), संतराम निसाद (38) व पवन निसाद (35) असे चार कामगार भाड्याच्या खोलीत राहतात. हे सर्वजण कागदी पुठ्ठे गोळा करून ते विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी कल्लू याने उर्वरित तिघांना घरातील भांडी घासणे आणि घराची सफाई करणे अशी कामे सोपवली आणि तो पुठ्ठा गोळा करण्याच्या कामाला निघून गेला.
रात्री 9.30 वा. तो घरी आला असता घरातील भांडी धुतलेली नव्हती तसेच घराची सफाई देखील करण्यात आली नव्हती. या मुद्द्यावर कल्लू आणि त्याच्या तीन साथीदारांमध्ये जोरदार भांडण झाले. यात प्रेमचंद निसाद याने कल्लूच्या शर्टाची कॉलर पकडून हाताने त्याच्या गालावर, डोक्यावर ठोशाने मारून खाली पाडले. त्यानंतर पवन निसाद हा ब्लेड घेऊन आला. या ब्लेडचा एक तुकडा त्याने स्वतःकडे ठेवला तर दुसरा तुकडा संतराम याच्याकडे दिला. दरम्यान पवन याने कल्लू याच्या उजव्या गालावर ब्लेड मारून दुखापत केली. तर संतराम याने त्याच्याकडील ब्लेडने कल्लू याच्या डाव्या खांद्यावर, डाव्या कुशीवर मारून दुखापत केली.
कल्लू निसाद याला त्याच्या अन्य नातेवाईकांनी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर कल्लू याने रात्री उशिरा त्याला झालेल्या मारहाणीची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार दोघा आरोपींना कणकवली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.