कणकवली ः कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार आ. नितेश राणे यांच्या प्रचारार्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या दौर्यावर येणार आहेत. यादरम्यान कणकवली, देवगड, वैभववाडी या तिन्ही तालुक्यात विनोद तावडे व खा. नारायण राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका होणार असल्याची माहिती भाजपचे कणकवली विधानसभाप्रमुख मनोज रावराणे यांनी दिली.
कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर उपस्थित होते. रावराणे म्हणाले, तावडे यांचे मंगळवारी कणकवलीत आगमन झाल्यानंतर सकाळी 11 वा.कणकवली तालुक्याची आढावा बैठक होणार आहे. तर देवगड तालुक्याची दुपारी 3 वा. फणसगाव येथे डॉ. सर्वेश नारकर यांच्या घरी बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वा. वैभववाडी भाजपा कार्यालयात वैभववाडी तालुक्याची आढावा बैठक होणार आहे.(Maharashtra assembly poll)
नितेश राणे हे जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी होण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी काम करत आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांनी केंद्रीय स्तरावर काम करताना बिहार, हरियाणा, जम्मू-काश्मिरमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली आहे.
आता त्यांच्या दौर्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होऊन ते अजून जोमाने कामाला लागतील. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खा. नारायण राणे यांच्या विजयासाठी विनोद तावडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्याचप्रमाणे याही निवडणुकीसाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास रावराणे यांनी व्यक्त केला.